मावळ तालुक्यातील पवन मावळ हे भाताचे कोठार समजले जाते. वारू हे गाव आज आधुनिक शेती पद्धतीने शेती करत आहेत. बऱ्याच दिवसापासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते, आता पाऊस हळुहळु सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी भात लागवड सुरु केल्या आहेत. वारू गावातील प्रगतशील शेतकरी व कृषिमित्र सुनील चिंचवडे यांच्या शेतात चारसूत्री पद्धतीने भात लागवड कृषिसहाय्यक विकास गोसावी यांच्या मार्गदर्शना खाली सुमारे एक एकर क्षेत्रावर करण्यात आली. ( Farmers started planting rice in modern way in Maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पावसाभावी भात लागवडी खोळंबल्या होत्या. परंतू चांगला पाऊस चालू झाल्याने शेतकऱ्यांनी भात लागवड दोरीच्या साह्याने 15 बाय 25 सेंमी अंतरावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड वारू, काळे, शिळींब परिसरात चालू केल्या आहेत. लागवडीनंतर यूरिया ब्रिकेट खत गोळ्याचा वापर चार चूडाच्या मधे एक गोळी अशा प्रकारे, लागवडी नंतर दोन ते तीन दिवसात लावणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भाताच्या उत्पादनात वाढ होणार आहे.
मजुराचा तुटवडा व ह्यावर्षी पाऊस उशीरा झाल्या कारणाने शेतकरी आधुनिक लागवडीकडे वळले आहेत. ह्या वर्षी बहुसंख्य शेतकरी चारसुत्री पध्दतीने लागवड करत आहेत. शेतकरी भातलावणी करताना तीन ते चार भातरोपे लावत आहेत. कमी रोपे लागत असल्यामुळे ही पद्धत शेतकरी मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. वारू, महागाव, मळवंडी ठुले, ब्राह्मनोली, काळे, येळसे, शिळींब, मोरवे, चावसर, प्रभाचीवाडी, सावंतवाडी, मालेवाडी, ढालेवाडी या गावात 200 हेक्टर क्षेत्रावर चारसूत्री भात लागवड करणार असल्याचे कृषिसहायक विकास गोसावी व कृषि पर्यवेक्षक नागनाथ शिंदे यांनी सांगितले.
“मावळ तालुक्यात खरीपातील भात हेच मुख्यपीक आहे. मावळ तालुक्यात 13500 हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकांची लागवड केली जाते. शेतकऱ्यांनी चारसूत्री, एस. आर. टी., यांत्रिकीकरण पद्धतीने भात लागवडी कराव्यात .भात लागवडी नंतर युरिया ब्रिकेटचा वापर करावा.” दत्तात्रय पडवळ (तालुका कृषि अधिकारी, मावळ)
“ह्यावर्षी पावसाने जून महिन्यात खंड दिल्याने रोपवाटिका उशिरा उगवल्याने व जुलै महिन्यात आता पाऊस पडत असल्याने पवनमावळ भात लागवडी चालू झाल्या आहेत. भातलागवडी उशिरा चालू झाल्या आहेत. परंतु आता पुन्हा पाऊस सक्रीय झाल्याने भात लागवडी सुरु झाल्या आहेत.” प्रशांत डहाळे (मंडळ कृषि अधिकारी, काळेकॉलनी)
“चारसूत्रीपद्धतीने भात लागवड केल्याने उत्पन्नात वाढ होते. बियाणे कमी लागते. खताचा खर्च वाचतो. कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न येते. वारू गावात शेतकरी चारसूत्री पद्धतीने मोठ्या प्रमाणात भात लागवड करतात.” सुनिल चिंचवडे (प्रगतशील शेतकरी तथा कृषिमित्र, वारू)
अधिक वाचा –
– कुंडमळा इथे वाहून गेलेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह सापडला, लेकाच्या मृतदेहाला बघताच आईने फोडला टाहो
– किशोर आवारे हत्या प्रकरण : कोर्टाकडून आरोपी भानू खळदे ह्याला ‘इतक्या’ दिवसांची पोलिस कस्टडी । Kishor Aware Murder Case