महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मावळ प्रांतास फार महत्व असून मावळ ही एक ऐतिहासिक भुमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांचे साथीने याच मावळात स्वराज्याचा श्रीगणेशा केला. त्यामुळे हि मावळची भूमी तमाम महाराष्ट्र वासियांसाठी पुण्यभुमी आहे. या मावळ तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये नैसर्गिक सौंदर्याने ओतप्रोत असे नयनरम्य सौंदर्यात येथील गडकिल्ले भर घालत आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
देशविदेशातून अनेक पर्यटक व गिर्याप्रेमी नेहमीच या गडकिल्यांना भेटी देण्यासाठी येत असतात. त्यामुळे मावळाचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गडकिल्यांची तसेच बौध्दकालीन लेण्यांची स्वच्छता राखणे व त्यांचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य समजून पुणे जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून टुरिझम पोलीसिंग अंतर्गत “वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा” हे अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियांतर्गत लोणावळा उपविभागातील गडकिल्ले व ऐतिहासिक स्थळांची पोलीस, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, पत्रकार, वकील यांचे सहभागातुन स्वच्छता केली जाणार आहे. या मोहिमेची सुरूवात श्री एकविरा गड व कार्ला येथील बौध्दकालीन लेण्यांची स्वच्छता करून केली जाणार असून बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी सकाळी साडेसहा वाजता अभियानाची सुरूवात होईल.
पोलीस अधिकारी, अंमलदार, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, पत्रकार, वकील यांचा या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग असेल, अभियानाच्या दुस-या टप्यामध्ये प्रत्येक आठवडयातील एक दिवस गडकिल्ले व लेण्यांची स्वच्छता केली जाणार असुन अभियानांतर्गत किल्ले लोहगड, किल्ले विसापुर, किल्ले तिकोणा, किल्ले तुंग, किल्ले राजमाची, याचबरोबर कार्ला लेणी, भाजे लेणी, टायगर पॉईन्ट, लायन्स पॉईन्ट, राजमाची पॉईन्ट, भुशी डॅम व सर्वात शेवटी पर्यटन पंढरी लोणावळा शहराची देखील स्वच्छता केली जाणार आहे.
या अभियानाद्वारे ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण व संवर्धनाबरोबरच स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न असल्याचे लोणावळा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक (आयपीएस) यांनी सांगितले. या अभियानामध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे असे त्यांनी यावेळी आवाहन केले आहे.
अधिक वाचा –
– मावळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी दारुंब्रे गावचे माजी सरपंच राजेश वाघोले यांची नियुक्ती
– ‘नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य, लोणावळा इथे परिषदेचे आयोजन’ – शालेय शिक्षण मंत्री