पुणे जिल्हा किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पीक कर्ज वाटपामध्ये सलग तिसऱ्या वर्षी उच्चांक गाठत दरवर्षी नवनवे विक्रम स्थापित करत आहे. सन २०२३-२४ मध्ये गतवर्षी ३१ डिसेंबर पर्यंतच एकूण ५ हजार ७६३ कोटी रुपये इतके पीक कर्ज वाटप जिल्ह्यात झालेले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वत: पुढाकार घेत सर्व बँकांना प्रोत्साहित केल्यामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. ( Highest Crop Loan Disbursement in Pune District 2024 )
गत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण ५ हजार २० कोटी रुपये आणि त्यापूर्वी २०२१-२२ मध्ये ३ हजार ८९३ कोटी इतके पीक कर्ज वाटप जिल्ह्यात झाले होते. तत्पूर्वी २०१५-१६ साली ३ हजार ५०६ कोटी ३१ लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले होते. त्यानंतर हा विक्रम थेट २०२१-२२ मध्ये मोडण्यात आला आणि त्यानंतर सलग तीन वर्षे नवीन विक्रम होत आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावर्षीच्या ५ हजार ५०० कोटी रुपये एवढ्या उद्दिष्टापेक्षा २६३ कोटी रुपये अधिक कर्ज वाटप करून उद्दिष्टाच्या १०५ टक्के कामगिरी केली आहे. यामध्ये मत्स्यव्यवसायासाठी २ कोटी २ लाख रुपये तसेच पशुपालनासाठी १७ कोटी ७६ लाख रुपये कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. फेब्रुवारी आणि मार्चची आकडेवारी समोर आल्यावर यात आणखी मोठी भर पडण्याची शक्यता आहे.
- हे यश मिळवण्यासाठी आर्थिक वर्षाच्या प्रारंभापासूनच सर्व बँकांचा वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटपाबाबत वेळोवेळी बँकाची जिल्हा पातळीवर बैठक घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँका, खासगी क्षेत्रातील बँका तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जास्तीत जास्त पीक कर्जवाटपासाठी प्रोत्साहित केले. या सर्व प्रक्रियेत जिल्हा अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनीदेखील मोलाची भूमिका बजावली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पुणे शहर परिमंडळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक राजेश सिंग व सध्याच्या महाव्यवस्थापक श्रीमती अपर्णा जोगळेकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
बँकांच्या जिल्हा समन्वयक तसेच क्षेत्रीय व्यवस्थापकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: दूरध्वनी व ई-मेलद्वारे संपर्क साधत अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. तालुकापातळीवर होणाऱ्या बैठका तसेच दर महिन्याला पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला. त्यामुळे उद्दीष्टापेक्षा अधिक कर्जवाटप शक्य झाले. यात जिल्ह्यातील सरकारी क्षेत्रातील सर्व बँका, खाजगी क्षेत्रातील सर्व बँका, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक या सर्वांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. या व्यतिरिक्त कृषी मुदत कर्ज वाटपामध्येही ६ हजार ६ कोटी हजार रुपये कर्ज वाटप झाले असून पीक कर्ज व कृषी मुदत कर्ज मिळून कृषी क्षेत्रासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण ११ हजार ७६९ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे.
गेली तीन वर्ष वार्षिक पतपुरवठा आराखडा योजनेनुसार ठरविण्यात आलेले लक्ष पार करून जिल्ह्यात कर्जवाटप करण्यात आले. २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात ८३ हजार २९७ कोटींचे उद्दिष्ट असताना २ लाख ५ हजार २५९ कोटी आणि २०२२-२३ मध्ये १ लाख १७ हजार ७१६ कोटींचे उद्दिष्ट असतांना २ लाख ७० हजार ९२५ कोटींचे कर्जवाटप झाले. त्या तुलनेत यावर्षी डिसेंबरअखेर २ लाख २३ हजार कोटींचे विक्रमी कर्जवाटप झाले असून चालू आर्थिक वर्षामध्ये या वर्षाचे उद्दिष्ट ३१ डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात आलेले आहे. उर्वरित तीन महिन्यांच्या कालावधीत आणखी कर्जवाटप होणार असल्याने हादेखील नवा विक्रम ठरणार आहे. मागील तीन वर्षात जिल्ह्याचा कर्ज वाटप आराखडादेखील ८३ हजार कोटी वरून २ लाख २७ हजार कोटीपर्यंत वाढवण्यात आला असून हादेखील एक विक्रम आहे.
या सर्व कर्ज वाटपामध्ये राज्य स्तरावरील बँकर्स कमिटीच्या सर्व सदस्य बँकांचे जिल्हा समन्वयक तसेच क्षेत्रीय व्यवस्थापक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,अग्रणी बँक कार्यालयातील प्रमोद सुर्यवंशी, पी.एस.सरडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशी माहिती जिल्हा अग्रणी व्यवस्थापक कारेगावकर यांनी दिली आहे.
अधिक वाचा –
– स्वारगेट डेपोची चावसर गाव मुक्कामी एसटी बस पुन्हा सुरु करण्याची मागणी
– समाज कार्यात अग्रेसर असलेल्या एकता प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते प्रकाशन
– शिवजयंती जल्लोषात साजरी होणार! प्रशासनाची जोरदार तयारी, जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश । Shiv Jayanti 2024