तुम्ही शेतकरी असाल तर एनए हा शब्द ऐकला नाही, असे अजिबात होणार नाही. एखादी जमीन एनए करायची म्हटल्यावर त्यासाठी वेगवेगळ्या विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रे घ्यावी लागायची आणि यासाठी बराच वेळ लागायचा. त्यामुळे एनएची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासन स्तरावर गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याचाच भाग म्हणून आता जमिनीचा वापर अकृषक (एनए) प्रयोजनासाठी करताना जिल्हाधिकाऱ्यांऐवजी आता ग्रामपंचायतींना अधिकार देण्यात आले असून गावापासून 200 मीटरच्या आत बांधकाम करताना स्वतंत्रपणे परवान्याची गरज भासणार नाही. याबाबत महसूल विभागाने शासन आदेश काढला असून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार दोन प्राधिकरणांकडे अर्ज करण्याची गरज नाही. नव्याने बांधकाम परवाना देताना बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणालीही विकसित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार शेतीसाठी उपयोग करण्यात येणाऱ्या कोणत्याही जमिनीचा वापर अकृषिक प्रयोजनासाठी करण्याकरिता किंवा एका अकृषिक प्रयोजनातून दुसऱ्या अकृषिक कारणासाठी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी गरजेची होती, मात्र आता त्यात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ( land NA permission authority to gram panchayat govt new rule gr )
विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा अंतिम झाल्यानंतर निवासी क्षेत्रातील बांधकाम परवान्यासाठी अर्ज केला जात होता, या अर्जाची एक प्रत महसूल विभागाकडे पाठविली जात होती. महसूल विभाग संबंधित जमिनीचा अकृषिक कारणासाठी परवाना देताना त्याचे शुल्क भरून घेत असे, याची पावती पुन्हा ग्रामपंचायतीत जमा केली जात असे. त्यानंतर बांधकाम परवाना दिला जात होता. या प्रक्रियेत नगररचना विभागाच्या सहायक संचालकांची दोन्ही वेळा परवानगी घेतली जात होती आणि त्यामुळे त्याचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे आता ग्रामपंचायतीकडे बांधकाम परवान्याचे अर्ज केल्यानंतर तेथेच अकृषिक परवाना शुल्क भरून घेतले जाणार आहे. त्यासाठी बांधकाम आणि विकसन परवाग्या देण्यासाठी बांधकाम परवानगी व्यवस्थापन ही ऑनलाइन प्रणाली वापरण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार सक्षम अधिकाऱ्याने एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजुरी देताना स्वतंत्रपणे अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तसेच ती जमीन अकृषिक वापरात रूपांतरित झाल्याचे मानण्यात येत असल्याने अशा जमिनींबाबत सक्षम प्राधिकरणाने बांधकाम परवानगी दिल्यास जमीनधारक, विकासकास स्वतंत्रपणे अकृषिक परवाना घेण्याची गरज नाही.
अधिक वाचा –
– “पवना आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले पाहिजेत”
– ‘श्री देवदर्शन यात्रा समिती पुणे’ यांच्याकडून ‘स्वच्छ सुंदर निर्मळ वारी’चे आवाहन । Wari 2023