Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील माजी नगरसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ते अरूण माने यांनी सोमाटणे फाटा येथील टोलनाका बंद करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथराव शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व जिल्हाधिकारी पुणे यांना पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, सोमाटणे फाटा येथील टोल नाका उभारलेला आहे. मुळातच या टोलनाक्यावर मिळणाऱ्या टोल पावतीवर देहूरोड असे छापले आहे. या टोल नाक्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. तासंतास वाहने या ठिकाणी अडकून पडून कामाचे तास वाया जातात. अनेक वर्षापासून हा बेकायदेशीर टोल नाका असा देखील म्हटला जातो. कारण दोन टोल नाक्यामधील अंतर ६० किलोमीटर असायला हवे असा नियम आहे. वरसोली आणि सोमाटणे हे ३२ किलोमीटरच्या अंतरात दोन टोलनाके कसे?
तसेच आपण टोल वसूल करत असताना स्थानिक गावांना सर्विस रस्त्याची गरज असते या ठिकाणी सर्विस रस्ते नाही, सतत टोल नाक्यावरती वाहतूक कोंडी होत आहे. ॲम्बुलन्स जाण्यासाठी स्वतंत्र सोय नाही, ज्या उद्देशाने टोलनाका उभारला जातो तो उद्देश म्हणजे आपण चांगले रस्ते देणार परंतु लोणावळ्यापासून ते निगडी पर्यंत फक्त चार पदरी रस्ता आहे आणि आपण ह्या चार पदरी वरती गेल्या अनेक वर्षापासून टोल वसुली करत आहोत. ही वसुली केव्हाच पूर्ण झालेले आहे परंतु वारंवार दुरुस्तीच्या नावाखाली आपण मुदतवाढ देतात. आणि सर्वसामान्य जनतेकडे सरळपणे टोल वसूल करतात हे अत्यंत चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी देखील अधिवेशनामध्ये हा टोल नाका बंद व्हावा म्हणून प्रश्न उपस्थित केला होता. तसेच सन २०२२- २३ मध्ये देखील हा टोल नाका बंद व्हावा म्हणून स्थानिक नागरिकांनी व स्वर्गीय किशोर आवारे यांनी उपोषणाच्या मागनि आंदोलन केलेले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री यांनी हा टोल नका बंद होईल असे आश्वासन देखील दिले होते. या टोलनाक्याची स्थानिक ग्रामपंचायत मध्ये नोंद नाही. मावळ तालुक्याचे तहसीलदार यांनी हा टोलनाका बेकायदेशीर आहे असे लेखी पत्र शासनाला दिले होते. तरी देखील हा टोल नाका राजरोसपणे टोल वसुली करत असून आपण यावर त्वरित कारवाई करून स्थनिक नागरिक आणि मावळ तालुक्यातील जनतेला या झिझिया करातून व वाहतूक कोंडीतुन कायमचे सोडवावे अशी विनंती केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ई-हक्क प्रणाली : वारस नोंद, 7/12 वरील इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे यासाठी आता घरबसल्या जमा करा कागदपत्रे
– नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई ; थेट खात्यात जमा होणार रक्कम
– HSC Exam Hall Ticket : बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध, असे करा डाउनलोड