पिंपरी पासून निगडी पर्यंत मेट्रोमार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी शहरवासियांनी अनेकदा आंदोलने केली. तसेच जनभावनेचा आदर करत खासदार श्रीरंग बारणे यांनी मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाच्या कामाचा मुहूर्त ठरला आहे. बुधवारी (दि. 6) सकाळी सव्वा दहा वाजता पीसीएमसी मेट्रो स्थानक येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या कामाचे उद्घाटन करणार आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
महामेट्रो कडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या दोन मार्गिकांवर काम सुरु आहे. त्यातील काही भाग दोन टप्प्यांत प्रवासी वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे. या मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन आणि दोन्ही टप्प्यातील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. आता पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाच्या कामाचे देखील उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ( Prime Minister Narendra Modi will inaugurate work of Pimpri to Nigdi Metro line online )
स्वारगेट ते पिंपरी या मार्गीकेवरील दापोडीतील हॅरिस ब्रिजपासूनचा मेट्रो मार्ग पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत येतो. मेट्रो पिंपरी पर्यंत आली मात्र ती निगडी पर्यंत सुरु होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार महामेट्रो कडून या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. त्याला राज्य शासनाची परवानगी मिळाली आणि हा अहवाल केंद्राकडे गेला. त्यानंतर याला मंजुरी मिळण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
महापालिकेने देखील या प्रकल्पाला सहमती दर्शवली. त्यानंतर पिंपरी ते निगडी या विस्तारीकरणाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने 23 ऑक्टोबर 2023 रोजी मान्यता दिली. पिंपरी स्थानकाजवळील एम्पायर इस्टेट पुलापर्यंत मेट्रो मार्गाचे काम झाले आहे. सध्या तिथे मेट्रो यार्ड आहे. तेथून पुढे मार्ग विस्तारीकरणाचे नियोजन आहे. पिंपरी ते निगडी दरम्यान चिंचवड स्टेशन (महावीर चौक व अहिंसा चौक दरम्यान), आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, निगडी (टिळक चौक व भक्ती-शक्ती चौक दरम्यान) अशी तीन स्थानके असणार आहेत. या कामासाठी 910 कोटी 18 लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. बुधवारी उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हे काम 39 महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असे म्हटले जात आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पिंपरी ते भक्ती शक्ती पर्यंतच्या मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष काम आता सुरु होत आहे. पिंपरी-चिंचवडकरांच्या स्वप्नांचा यानिमित्ताने विस्तार होत आहे. हा मेट्रो मार्ग पुढे किवळे, मुकाई चौक आणि वाकड चौकापर्यंत जाण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. हिंजवडीपर्यंत आलेला मेट्रो मार्ग नाशिक फाटा मार्गे चाकण पर्यंत विस्तारित करण्यासाठी देखील मी पाठपुरावा करत आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.”
अधिक वाचा –
– सुदुंबरे येथील सिद्धांत महाविद्यालयात शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण सत्र; नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम
– शिवली-भडवली ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पॅनलला झटका! सरपंचपदाच्या निवडणूकीत माधुरी आडकर विजयी । Gram Panchayat Election
– लोणावळ्यातील रामनगर भागात जबरी चोरी! एकाच रात्री तीन घरात घरफोडी, तब्बल 3 लाख 21 हजारांचा मुद्देमाल लंपास । Lonavala Crime News