पवनमावळ ( प्रतिनिधी-रवि ठाकर ) : ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ अशी आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे, ज्याचा अर्थ अथक प्रयत्न आणि चिकाटी असल्यास अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते. आर्डव गावातील (ता. मावळ) साईनाथ रमेश वरघडे यांनी इंग्रजी भाषेबाबत ही म्हण खरी करून दाखवली आहे. इंग्रजी भाषेची भीती, इंग्रजी येत नसल्याने येणारा न्यूनगंड यामुळे अनेक विद्यार्थी आयुष्यातील शिक्षणाची पायरी अर्धवट सोडतात. परंतु जिद्दीने, चिकाटीने प्रयत्न केले तर इंग्रजी भाषाही आपलीशी करता येते, हे साईनाथ वरघडे यांनी दाखवून दिले. तब्बल २६ वर्षांनंतर इंग्रजी भाषेचा पेपर सोडवून साईनाथ वरघडे अखेर दहावी पास झाले आहेत.
शुक्रवारी (दि. ८ मे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा (इ. 10वी बोर्ड परीक्षा) निकाल जाहीर झाला. हा निकाल जाहीर होताच आर्डव येथील साईनाथ वरघडे आणि त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण गेली २६ वर्षे अनेकदा प्रयत्न करूनही जो इंग्रजी विषय सुटला नव्हता, तो विषय यावेळी अधिक मेहनत व प्रामाणिक प्रयत्नांतून सोडवता आला होता आणि साईनाथ वरघडे दहावी पास झाले होते.
साईनाथ वरघडे यांनी 1999-2000 साली इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. त्यावेळी त्यांना इंग्रजी विषयात केवळ २५ गुण मिळविता आल्याने ते नापास झाले होते. दहावी नापास झाल्यानंतर घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे वरघडे यांना शेती आणि पॉलिहाऊसमध्ये काम करावे लागले. परंतु त्या परिस्थितीतही दहावी नापास हा शिक्का पुसण्याचे त्यांनी मनात ठरविले होते. यामध्ये त्यांना त्यांचे कुटुंबीय आई-वडील, भाऊ आणि पत्नीची साथ होती. त्यामुळे २००० सालानंतर अनेकदा त्यांनी इंग्रजीचा पेपर दिला, परंतु इंग्रजीचा किल्ला काही सर होत नव्हता. यंदा मात्र आपल्या लहान मुलांप्रमाणे दिवसातून एकवेळ अभ्यासाला देऊन त्यांनी इंग्रजी भाषेला आपलेसे केले आणि मार्च मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाचा पेपर तितक्याच आत्मविश्वासाने सोडविला. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना चांगलेच यश मिळाले आणि तब्बल ६४ गुण घेत ते इंग्रजी विषय आणि सोबतच आता दहावी देखील पास झालेत.
साईनाथ वरघडे यांच्या या जिद्दीचे आणि यशाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. ” गुलाब येवले मित्र मंडळ ” मधील त्यांचे सहकारी मित्र यांनीही वरघडे यांच्या या यशाचे कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले आहे. काम, व्यावसायात प्रामाणिक असणारे साईनाथ वरघडे यांच्या या जिद्दीची प्रेरणा सर्वजण घेतील आणि अपयशाने खचून न जाता विद्यार्थी पुन्हा जोमाने अभ्यास करतील, असा विश्वास “गुलाब येवले मित्र मंडळातील” सदस्यांनी व्यक्त केलाय.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम
– तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा
– इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार
– विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता