Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ‘अ’ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगरसेवक मजनू ऊर्फ मदन हनुमंत नाटेकर यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दावा अमान्य ठरवून जात प्रमाणपत्र अवैध घोषित केल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार ही कारवाई केली.
मंगळवारी (दि. ४) जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले. या आदेशानुसार मजनू नाटेकर यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले असून, त्याची प्रत तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष अमोल यादव, सदस्य सचिव शिवकांत चिकुर्ते आणि सदस्य संजय दाणे यांनी नाटेकर यांच्या जात वैधतेच्या प्रकरणाची सुनावणी करून त्यांचा जातीचा दावा अमान्य ठरविला. त्यानंतर संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्रही अवैध घोषित केले.
मजनू नाटेकर यांनी तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० ‘अ’ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. ही जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होती. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात करुणा प्रकाश सरोदे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता.
जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे निवडणुकीसाठी आवश्यक पात्रता रद्द झाली असून, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप
– ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं
