प्रतिनिधी – संध्या नांगरे : आजकाल तरुणाई म्हटलं की करिअर-नोकरी-लग्न- मौजमजा हीच चौकट साधारणपणे सर्वत्र पाहायला मिळतेय. स्वतःचं ‘लाईफ व्यवस्थित सेट करण्यासाठी’ चाललेल्या या धावपळीत अन् धडपडीत तरुणाई आत्मकेंद्री झालीये. तरुणाईचं समाजभान कमी कमी होतंय. परंतु, या चित्रामध्ये असलेला एक अपवाद म्हणजे मदत वेल्फेअर ट्रस्टची संस्थापक-अध्यक्ष दीपाली वारुळे (वय 26). आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून गरजू लहान मुलांना, वृद्धांना आणि स्वयंसेवी संस्थांना तिनं मदतीचा खंबीर हात दिलाय. तारुण्याच्या उंबरठ्यावर तिनं उभारलेलं हे सामाजिक कामच तिचं तेज आहे आणि हे तेजच तरुणाईलाही खऱ्या अर्थानं तेजस्वी बनण्यासाठी दिशा देणारं आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दीपाली मूळची अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरची. तिचं शालेय शिक्षण मूळ गावी पूर्ण झालं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी सन 2015 मध्ये दीपाली पुण्यात आली. मॉडर्न महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवीधर झाली. पुढं, अधिकारी बनायचं एक स्वप्न बाळूगन ती स्पर्धा परीक्षेची तयारी करु लागली आणि तयारी करत असतानाच पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयातून तिने पदव्युत्तर पदवी (M. A.) पूर्ण केली. याचवेळी, दीपाली कविता व ललित लेखनही करायची, सादरीकरण करायची. त्यामुळं विविध संस्था तिला माहिती झाली. दीपालीच्या काही मैत्रिणी स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करायच्या. समाजात काम करण्याची आवड असल्यानं दीपालीही या एनजीओंसोबत काम करु लागली. इथं अनेक मोठ्या संस्थांचा तिला परिचय झाला. ( Youth Day Special Pune Help Welfare Trust President Deepali Warule Biography )
या मैत्रिणींना एनजीओंसोबत काम करताना महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. त्या म्हणजे, स्वयंसेवी संस्था नावाजलेल्या असूनही तिथे कामात पारदर्शकता नाही आणि अगदी तळागाळापर्यंत या संस्था पोचत नाहीयेत. मग, यात आपण काय वाटा देऊ शकतो यावर या युवतींनी विचार केला. स्वयंसेवी संस्थांचा अभ्यास केला, सामाजिक क्षेत्रात करणारया प्रतिनिधींचं मार्गदर्शन घेतलं आणि दीपालीच्या पुढाकारानं मदत वेल्फेअर ट्रस्टची स्थापना झाली. सामाजिक काम करण्यासाठी दिपालीनं मैत्रिणींना केलेल्या आवाहनाला जेमतेम प्रतिसाद मिळाला म्हणजे समाजकार्याची आवड असणाऱ्या मोजक्याच मैत्रिणी संस्थेत सहभागी झाल्या. सन 2018 मध्ये संस्था नोंदणीकृत झाली अन् दीपालीनं पूर्णवेळ सामाजिक कामच करण्याचा ध्यास घेतला.
- वंचित लहान लेकरांची उन्नती करायची ही दीपालीची तळमळ आहे. प्रारंभी विद्यार्थी दशेत असल्याने मोजकंच काम करायला सुरूवात केली. पुण्यात विविध परिसरात मोलकरीणींच्या मुलीचं सर्वेक्षण केलं. त्यात पैसे कमवण्यासाठी मुलींनी शाळा सोडल्याचं समोर आलं, मग मदत ट्रस्टच्या युवतींनी या मुलींना शाळेत जायला मदत केली. जवळपासच्या ग्रामीण व आदिवासी भागात वंचित-गरजू लहान मुलांना, इतर गरजूंना विविध प्रकारे मदत केली. पुणे आणि आसपासच्या भागात काम करता करता दीपालीनं ‘मदत’चा कार्यविस्तार हाती घेतला आणि अल्पावधीतच संबंध महाराष्ट्रात युवा प्रतिनिधींचं भक्कम जाळं तयार केलं. फेसबुकसारख्या समाजमाध्यमातून आणि मैत्रिणींच्या मैत्रीतून जिल्हानिहाय प्रतिनिधी नेमले आणि हे प्रतिनिधी म्हणजे नव्या दमाच्या युवतीच आहेत. हे फार कौतुकास्पद आहे. या सर्व प्रतिनिधींना त्यांच्या जिल्ह्यातील वंचित मुलांसाठी, वृद्धांसाठी चांगलं काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था शोधायच्या हे काम सोपवलं आणि दीपालीच्या नेतृत्वाखाली ते उत्तमरित्या पार पडत आहे.
गेल्या सहा वर्षात मदत वेल्फेअर ट्रस्टने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढून गावागावातील तसेच राज्याबाहेरील अशा 40 हून अधिक स्वयंसेवी संस्थांना (अनाथाश्रम, महिलांचा आश्रम, वृध्दाश्रम) भक्कम आर्थिक मदत व इतरही विविध प्रकारे केली आहे आणि 500 मुलांचं पालकत्व ट्रस्टने स्विकारलं आहे. या मदतीसाठी या तरुणाईने लाखो रुपये मोठ्या जबाबदारीनं खर्च केले आहेत. एखाद्या संस्थेची माहिती मिळाल्यावर दीपाली आणि तिच्या सहकारी त्या संस्थेला भेट देतात, संस्थेचे कामकाज पाहून, संपूर्ण माहिती घेऊन ती संस्था निष्ठेने, पद्धतशीर काम करत असेल तरच त्या संस्थेला मदत वेल्फेअर ट्रस्टशी जोडले जाते आणि मग त्या संस्थेच्या गरजेनुसार आर्थिक मदत संस्थेला दिली जाते.
मदतनिधी उभा करण्यासाठी समाजमाध्यमातून आवाहन केले जातेच शिवाय दानशूर व्यक्ती, कंपन्या आणि विविध क्षेत्रातील अधिकारी वर्ग यांच्याशी सातत्याने संपर्क केला जातो. मदतीचा विनियोग व्यवस्थित झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी मदत दिल्यानंतर या युवती सातत्याने त्या ठिकाणी भेटी देत असतात त्यामुळं त्या संस्थेच्या कामकाजात शिस्तही राखली जाते आणि विशेष म्हणजे ही मदत गरजू मुलांना किंवा व्यक्तीला व्यवस्थितपणे पुरेल एवढी असते. याशिवाय सन 2019 व 2021 मध्ये पूरग्रस्तांनाही ट्रस्टने मदतीचा हात दिला आहे.
भविष्यात, दीपालीला मदत वेल्फेअर ट्रस्टची पुण्यात वंचित मुलांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी निवासी शाळा काढायची आहे आणि त्यासाठी ती प्रयत्नशील आहे. या समाज कार्यासाठी दीपालीचा सन्मानही झाला आहे. दीपालीला लेखनाची आवड असल्यामुळं ट्रस्टतर्फे विविध पुरस्कार दिले जात आहे. नवोदित कवयित्रीसाठी नवोन्मेषी पुरस्कार, नवोदित गझलकारांसाठी गझल दर्पण पुरस्कार, विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणारया व्यक्तीसाठी कर्तव्यश्री पुरस्कार आणि उत्कृष्ट सामाजिक कार्य करणारया संस्थेला पसायदान पुरस्कार प्रदान केला जातो ही वेगळी आणि सुंदर गोष्ट आहे.
“मला अनाथ मुलांसाठी काम करण्याची इच्छा होती. पण, नेमके कसं काम करायचं माहिती नव्हतं. पुढं दिशा मिळाली, सगळं जुळत गेलं आणि माझ्या आवडीचं काम करण्याची संधी मला मिळाली. समाजात काम करताना मला खूप शिकायला मिळतंय. या कामाने माझ्यात आत्मविश्वास आला. माझे विचार स्पष्ट झाले, माझा दृष्टीकोन व्यापक झाला, व्यवस्थेचा आणि समाजाचा अभ्यास होतोय, सामाजिक जाणीव खोलवर रूजतेय. मी अखंडपणे सामाजिक क्षेत्रातच काम करणार आहे. युवा वर्ग एकत्र आल्यास खूप मोठं काम उभं राहू शकते. त्यामुळं युवा वर्गात समाजभान असलचं पाहिजे. तेव्हाच समाज व देशाची नेहमीच प्रगती होईल.” – दीपाली वारुळे
मदत वेल्फेअर ट्रस्टची मदत –
नवरत्न ओल्ड एज होम पुणे, अर्पण ओल्ड एज होम पुणे, अनिकेत सेवाभावी संस्था पुणे, प्रश्नचिन्ह शाळा अमरावती, माउली सेवा प्रतिष्ठान अहमदनगर, हेडगेवार पब्लिक स्कूल आणि आश्रम संभाजीनगर, प्रज्वला संस्था हैदराबाद, सार्थक सेवा संघ सासवड, एहसास संस्था सातारा, अवनी आश्रम कोल्हापूर, गोकुळ, मातृमंदीर संस्था रत्नागिरी, सेवालय लातूर आणि इतर
अधिक वाचा –
– सॉल्लिड कामगिरी! कामशेत पोलिसांकडून गहाळ झालेल्या 19 मोबाईलचा शोध, थेट कर्नाटकातून हस्तगत केले फोन । Maval Crime
– पवना आणि टाटा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर विशेष बैठक संपन्न । Maval News
– करुंज-बेडसे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण