Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांकडून पाणीपुरवठा, स्वच्छता याबाबत सातत्याने तक्रारी होत आहे. तसेच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने उद्योजक नाराज आहे. याबद्दल आता शहर भाजपाने आवाज उठविला असून शहरातील अस्वच्छता, पाणीपुरवठा आणि रस्त्यांचे प्रश्न लवकर सोडवावेत, अन्यथा आंदोलन करू याबाबत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव दाभाडे शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या काही मार्गी लागताना दिसत नाही. शहरात सर्वच विभागात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पाण्याचे अनियमित नियोजन, ठरलेल्या वेळेत पाणी न येणे, पाण्याला प्रेशर नसणे, कमी वेळ पाणी येणे असे प्रकार होत असल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे. हा प्रश्न लवकर मार्गी लावावा अन्यथा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेवर ‘कोरडा हंडा मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
आठवडे बाजार असलेल्या परिसरात स्वच्छतागृहे उभारावी –
दर रविवारी तळेगाव दाभाडे शहरात आठवडे बाजार असतो. शहर आणि परिसरातील नागरिक येथे खरेदीसाठी येतात. परंतु आठवडी बाजारात सोयीसुविधांचा अभाव आहे. जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक येथे महिलांकरिता स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे. तसेच खांडगे पेट्रोल पंप जवळ, मेथडीज स्कूल जवळ, तळेगाव स्टेशन चौक, लिंब फाटा इथेही सुलभ शौचालय उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
- तळेगाव शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साठलेले पाणी, कचरा, अस्वच्छता यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे, सांडपाणी साठलेल्या ठिकाणी, कचरा साचलेल्या ठिकाणी नगरपरिषेच्या संबंधित विभागाने लक्ष देऊन तिथे स्वच्छता करुन घ्यावी. शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता वेळेवर न झाल्यास ‘कचरा स्वच्छता आंदोलन’ करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यासह, शहरातील ऐतिहासिक तळ्यांची स्वच्छता व्हावी आणि त्याठिकाणी जात असलेले सांडपाणी रोखून तळ्यांची निगा राखली पाहिजे. महत्वाचे शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अनेक भागात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे सामान्यांचे बळी जाऊ शकतात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. ( BJP statement to Nagar Parishad regarding issue of sanitation and water supply in Talegaon Dabhade )
यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष संतोष दाभाडे, रजनीताई ठाकूर, विनायक भेगडे, सुनिता पाटील, निर्मल ओसवाल, शोभा भेगडे, तनुजा दाभाडे, मृदुला भावे, पौर्णिमा उपाध्याय, विनोद उपाध्याय, रोहन जाधव, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा शोभा परदेशी, वंदना दाभाडे, मीना भेगडे, साधना भेगडे, संजोगता आगळे, विद्या भेगडे, जयश्री टकले, अनिता भेगडे उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘हर घर तिरंगा’ अभियान जनजागृतीसाठी पवनानगर येथे प्रभातफेरी ; विद्यार्थ्यांची भर पावसात तिरंगा रॅली । Pavananagar
– मोठी बातमी ! कामशेत आणि वडगाव मावळ येथील दोन ऑर्केस्ट्रा बार मालकांवर गुन्हे दाखल । Maval Crime News
– विरोध कालही, आजही आणि उद्याही ! पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार – रविंद्र भेगडे