Dainik Maval News : तीर्थक्षेत्र देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर विश्वनाथ मोरे यांची निवड झाली आहे. सोमवारी (दि.31) झालेल्या अध्यक्ष व विश्वस्तपदाच्या निवडणूकीत त्यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली आहे.
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्त मंडळाची निवडणूक सोमवारी, दिनांक 31 मार्च रोजी पार पडली. सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान प्रक्रिया संपन्न झाली, तदनंतर मतमोजणीला सुरुवात झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी जालिंदर विश्वनाथ मोरे हे विजयी झाले आहेत. तर विश्वस्तपदी विक्रम मोरे, वैभव मोरे, गणेश मोरे, उमेश मोरे, दिलीप मोरे, लक्ष्मण मोरे निवडून आले आहेत.
- संस्थानच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत एकूण तीन उमेदवार होते. संस्थानच्या तीन शाखापैकी गोविंदबुवा शाखेतील अध्यक्ष यावेळी होणार होते, त्यासाठी शाखेतून विश्वजित मोरे, कैलास मोरे, जालिंदर मोरे या तिघांनी उमेदवारी अर्ज भरले होते. यापैकी जालिंदर मोरे यांची संस्थांच्या अध्यक्षपदासाठी निवड झाली. अध्यक्षपदी विजयी झालेले जालिंदर मोरे यांना एकूण 163 मते मिळाली.
निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अंकुश मोरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सुजित मोरे आणि शामकांत मोरे यांनी कामकाज पाहिले.
तीन शाखांमधून सहा विश्वस्त
गोविंदबुवा शाखेतून विद्यमान विश्वस्त संजय मोरे, विक्रमसिंग मोरे, अशोक मोरे, जयसिंग मोरे, वैभव मोरे, रोहन मोरे, विवेक मोरे निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी विक्रम मोरे, वैभव मोरे हे 42 मतांनी निवडून आले. गणेशबुवा शाखेकडून विद्यमान विश्वस्त अजित मोरे, श्रीराम मोरे, धनंजय मोरे, उमेश मोरे, सचिन मोरे, गणेश मोरे निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी गणेश मोरे हे 35 तर उमेश मोरे 26 मतांनी निवडून आले. आबाजीबुवा शाखेकडून विक्रम मोरे, भास्कर मोरे, दिलीप मोरे, जयंत मोरे, अमोल मोरे, लक्ष्मण मोरे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातून दिलीप मोरे, लक्ष्मण मोरे दोघे निवडून आले.
सहा वर्षे देवस्थानचा कारभार पाहणार
देहूगाव संस्थानच्या एकूण तीन शाखा आहेत. आबाजीबुवा शाखा, गणेशबुवा शाखा आणि गोविंदबुवा शाखा. या तिन्ही शाखांमधून प्रत्येकी दोन असे सहा विश्वस्त निवडले जातात. तर, प्रत्येक शाखेतून दोन वर्षासाठी एक अध्यक्ष निवडला जातो. आता निवडून आलेले सहा विश्वस्त आणि प्रत्येक दोन वर्षांनी निवडला जाणारा अध्यक्ष हे पुढील सहा वर्षे देवस्थानचा कारभार सांभाळणार आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade