Dainik Maval News : यंदाचा गणेशोत्सव (Ganesh Utsav 2025) आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी गणेश मंडळांकडून गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे. मावळ तालुक्यातही ( Maval Taluka ) सर्वच शहरांत गणेश मंडळांकडून ( Ganesh Mandal) गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू आहे.
अशातच तालुक्यात यंदा डिजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याबाबत आवाहन काही संस्थांकडून करण्यात आले आहे, तसेच पोलीस प्रशासनाने देखील याबाबत भूमिका घेतली आहे. यासह लोकप्रतिनिधींनी देखील डिजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहान केले आहे. परंतु काही गणेश मंडळांनी मात्र डिजेसाठी आग्रह धरला असून तळेगाव शहरात याबाबत गणेशमंडळांची एकजुट पाहायला मिळाली आहे.
तळेगाव दाभाडे शहरातील अनेक गणेश मंडळांनी एकत्र येत तालुक्याचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांसह गणेश काकडे, गणेश भेगडे, संतोष दाभाडे, अरुण माने, गणेश खांडगे आदी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन श्री डोळसनाथ मंदिरात एक बैठक आयोजित केली होती. ज्यात नियमात राहून डिजे युक्त गणेशोत्सवासाठी मंडळांनी आग्रह धरल्याचे पाहायला मिळाले, तसेच राजकीय नेत्यांनीही त्याला सकारात्मक पाठींबा दिल्याचे दिसून आले.
यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले, “जास्तीत जास्त मंडळांनी ढोल पथकाचा वापर करावा. ज्या मंडळांना वेळेअभावी ढोल पथक मिळणार नाही, त्यांनी डीजे लावण्यास हरकत नाही; परंतु जे काही असेल ते नियम व कायद्याच्या अनुषंगाने असावे.”
माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे म्हणाले, “ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मंडळी यांचा समतोल राखून आपण निर्णय घेऊ. डीजे लावण्यास हरकत नाही; परंतु गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तळेगाव दाभाडे गावाला साजेशी मिरवणूक काढावी.”
माजी नगरसेवक गणेश काकडे म्हणाले, “तळेगाव मंडळातील सर्व कार्यकर्ते वर्षभर सामाजिक उपक्रम व धार्मिक कार्यक्रम राबवत असतात. कार्यकर्त्यांची एकच मागणी असते की त्यांना फक्त एक दिवस आपल्या मिरवणुकीचा आनंद लुटू द्या. कार्यकर्त्यांकडून तो आनंद हिरावून घेऊ नका. आणि लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आम्ही डीजेच्या उत्साहात मिरवणूक काढणार आहोत.”
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले, “गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते सुज्ञ आहेत. त्यांना चूक आणि बरोबर काय आहे ते कळते. दरवेळेस हा विरोध गणेशोत्सवाच्या वेळेसच का होतो? कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि यावर्षी तळेगाव दाभाडेमध्ये डीजे वाजणारच.”
सदर बैठकीसाठी तळेगावातील अनेक गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. त्यामध्ये सुधीर सरोदे, मिथुन काकडे, शुभम खोमणे, आकाश टकले, अक्षय दाभाडे, सौरभ जाधव इत्यादी कार्यकर्त्यांच्या नियोजनाद्वारे ही बैठक यशस्वीपणे पार पडली. या बैठकीनंतर तळेगावातील गणेशोत्सव मंडळांत समाधानाची भावना पसरली असून यंदाचा गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे जल्लोषात साजरा होणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर
