Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या गटनेतेपदी इंदापूरचे श्रीमंत पोपट ढोले यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, संभाजी होळकर व विठ्ठल शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गटनेता निवडण्याबाबत चर्चा झाली. तदनंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून गटनेते पदाचे नाव निश्चित केले.
शुक्रवारी (दि.६ मार्च) जिल्हाधिकारी कार्यालय येथे नवनिर्वाचित सदस्यांची गटस्थापन व गटनेते निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्या सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार जि.प. सदस्य श्रीमंत ढोले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी आमदार सुनील शेळके, रमेश थोरात, संभाजी कुंजीर, अशोक बापू पवार, सुरेश घुले , दिगंबर दुर्गाडे यांच्यासह पक्षाचे नवनिर्वाचित सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान श्रीमंत ढोले यांनाच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले जाणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी गटनेता म्हणून आगामी काळात ढोले जिल्ह्यातील कारभार पाहणार आहेत. तसेच यानिमित्ताने इंदापूर तालुक्याचे जिल्हा परिषदेवरील राजकीय वर्चस्व अधिक घट्ट झाले आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ७३ पैकी ५१ जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मिळाल्या आहेत. यामध्ये श्रीमंत पोपट ढोले हे पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी गटातून निवडून आले आहेच. तसेच ते सलग दोन वेळा निवडून आले आहेत.
पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीचा मुहूर्त यापूर्वीच जाहीर झाला असून, येत्या १८ मार्च रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्यामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणे हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे सध्या पक्षात अध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे.
पक्षाचा गटनेता किती महत्वाचा असतो?
जिल्हा परिषद गटनेता हा आपल्या राजकीय पक्षाचा जिल्हा परिषदेतील सर्वोच्च प्रतिनिधी असतो. तो सभागृहात पक्षाची भूमिका मांडतो. सदस्यांमध्ये समन्वय साधणे आणि पक्षाच्या धोरणांनुसार विकासकामे व धोरणात्मक निर्णयांवर प्रभाव पाडत असतो. पक्षाच्या अध्यक्षांशी व सदस्यांशी संवाद साधून तांत्रिक व कायदेशीर बाबींवर पक्षाचे मते ठरवतो.
पक्षाची भूमिका मांडणे : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व इतर महत्त्वाच्या सभांमध्ये आपल्या पक्षाची अधिकृत भूमिका मांडणे.
सदस्यांमध्ये समन्वय : पक्षाच्या सदस्यांना (सभागृह सदस्य) धोरणात्मक मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यात एकता राखणे.
विकासकामांचा आढावा : जिल्ह्यात चाललेल्या विकासकामांचा (शिक्षण, आरोग्य, रस्ते) आढावा घेणे आणि आवश्यक ते बदल सुचवणे.
बैठकांचे आयोजन : पक्षाच्या अंतर्गत बैठका बोलावून धोरणे ठरवणे आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे.
अध्यक्षांशी चर्चा : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि प्रशासन यांच्याशी चर्चा करून पक्षाच्या विकासकामांना प्राधान्य देणे.
जिल्हा परिषद गटनेत्याचे अधिकार :
व्हिप जारी करणे : पक्षीय निर्णयानुसार सभागृहात मतदान करण्यासाठी सदस्यांना ‘व्हिप’ बजाविण्याचा सर्वोच्च अधिकार, ज्याचे पालन न केल्यास सदस्यांचे पद धोक्यात येऊ शकते.
महत्त्वाच्या समित्यांवर नियुक्ती : विषय समित्या किंवा स्थायी समित्यांवर आपल्या पक्षाच्या सदस्यांची वर्णी लावणे.
धोरणात्मक निर्णय : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आणि नवीन योजनांवर पक्षाचे मत मांडून निर्णयावर प्रभाव पाडणे.
सदस्यांच्या समस्या मांडणे : आपल्या गटातील सदस्यांना प्रशासकीय किंवा इतर समस्या सोडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
अविश्वासाचा प्रस्ताव : आवश्यकतेनुसार अध्यक्षांविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव किंवा इतर तांत्रिक प्रक्रियांत पुढाकार घेणे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा !
– महत्वाची बातमी ! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर होणार
– मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी होणार निवड
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ?