Dainik Maval News : मावळ तालुक्यातील मळवंडी ठुले येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ स्मारकाचे रविवारी (दि. १५) अत्यंत उत्साहात आणि ऐतिहासिक वातावरणात उद्घाटन पार पडले. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते स्मारकाचे अनावरण करण्यात आले.
राजे छत्रपती शिवराय प्रतिष्ठान, शिवराज ग्रुप यांच्या पुढाकारातून हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्याला पवन मावळ परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली. स्वराज्याच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ले तिकोणा येथून आणलेली शिवज्योत गावात दाखल होताच संपूर्ण परिसर जय भवानी, जय शिवाजी च्या जयघोषाने दुमदुमून गेला. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात व पारंपरिक वाद्यांच्या निनादात भव्य पालखी सोहळा काढण्यात आला.
भगवे ध्वज, पारंपरिक वेशभूषेतील मावळे तसेच महिलांच्या मोठ्या सहभागामुळे मळवंडी ठुले गावात जणू शिवकाल अवतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. या वेळी आयोजित व्याख्यानात प्रसिद्ध शिवव्याख्याते संपत गारगोटे यांनी शिवराय आणि आजचा समाज या विषयावर मार्गदर्शन केले.
स्मारकाचे अनावरण करताना आमदार सुनील शेळके म्हणाले की, शिवराज ग्रुपने उभारलेले हे स्मारक येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. मावळच्या मातीचा स्वाभिमान या स्मारकाच्या रूपाने कायम तेवत राहील. या वेळी जिल्हा परिषद सदस्य संतोषभाऊ राऊत, पंचायत समिती सदस्या शैलाताई कालेकर, सुवर्णा राऊत, पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक सुरेश चिंचवडे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राजे छत्रपती शिवराय प्रतिष्ठान, शिवराज ग्रुप, ग्रामपंचायत मळवंडी ठुले व गावातील युवक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच योगेश राक्षे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण
– राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी
– मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली ; एलईडी दिव्यांमुळे होताहेत अपघात