Dainik Maval News : बुधवारी (दि. १८ मार्च) रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आणि उपाध्यक्ष पदाची निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. मागील महिन्यात निकाल लागलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता (७३ पैकी ५१ सदस्य) आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तसेच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हाही राष्ट्रवादीचा होणार, हेही निश्चित आहे. अशात बुधवारी होणाऱ्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून स्व. अजित पवार यांच्या पश्चात पक्षाचे सर्वाधिकार हाती असलेल्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार ह्याच याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.
दरम्यान अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती किंवा नावे समोर आलेली नसल्याने इच्छुककांकडून अजूनही आपल्याला संधी मिळावी याकरिता जोर लावला जात आहे. तसेच सह्यांची मोहीम राबवून लॉबिंग करणे, नेते मंडळींकडून आपल्या नावावर मोहोर उठविण्यासाठी बैठका घेणे, या गोष्टी जोरात सुरू आहेत. परंतु अंतिम निर्णय सुनेत्रा पवार याच घेणार असल्याने, त्या नक्की कुणाच्या नावावर मोहोर उमटविणार आणि नक्की कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची आणि कुणाच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडणार, याबद्दल सस्पेन्स कायम आहे.
काही दिवसांपूर्वीच इंदापूरचे श्रीमंत ढोले यांची पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेता म्हणून निवड पाड पडली. त्यानंतर बुधवारी होत असलेल्या अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडीसाठी अनेक मातब्बरांची नावे देखील चर्चेत आली आहेत. तालुकानिहाय बोलायचे झाल्यास दौंड, इंदापूर, मुळशी आणि मावळ तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्षपद जाईल, अशी खात्रीशीर चर्चा सुरू आहे.
परंतु अलीकडे, मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभा केलेला दबदबा आणि खेचून आणलेली निर्विवाद सत्ता, याच्या जोरावर, तसेच आजपर्यंत कधीही मावळ तालुक्याला अध्यक्षपद मिळालेले नसल्याने मावळ तालुक्यात यावेळी जि.प. अध्यक्षपदाची किंवा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा होत आहे.
मावळच्या या शिलेदाराची वर्णी लागण्याची शक्यता :
मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण पाच गट अर्थात पाच जागा असून या पाचही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सदस्य म्हणून निवडून आले आहेत. यापैकी, काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गटातील ( सर्वसाधारण जागेवर) निवडून आलेले सदस्य संतोष गबळु राऊत यांचे नाव अध्यक्षपदाची सर्वाधिक चर्चेत आहेत. तसेच अध्यक्षपद न मिळाल्यास उपाध्यक्षपदी किंवा समितीवरही संतोष राऊत यांची वर्णी लागू शकते, अशी जोरदार चर्चा आहे. सोबतच नितीन मुऱ्हे, दीपाली हुलावळे, पल्लवी दाभाडे, अनंता पावशे यांनाही जबाबदारी दिली जावू शकते, असेही बोलले जात आहे. परंतु आमदार सुनील शेळके यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केले नसल्याने, मावळकडूनही याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण
– राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी
– मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली ; एलईडी दिव्यांमुळे होताहेत अपघात