Dainik Maval News : मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड येथे नुकतीच गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून ‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातूम आयोजित या उपक्रमात शेकडो शिवभक्त आणि तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले. यासह आमदार जयंत पाटील यांनीही प्रत्यक्ष हातात फावडे घेऊन श्रमदान करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
मोहिमेदरम्यान किल्ल्यावरील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेसोबतच पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावरही भर देण्यात आला. यामध्ये मार्गदर्शक फलक, ऐतिहासिक माहिती देणारे फलक, विश्रांतीसाठी बाकांची व्यवस्था तसेच सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांची बसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर अनुभव मिळणार आहे.
ही मोहीम “एक रविवार शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांसाठी” या संकल्पनेतून राबवण्यात येत असून, मागील काही महिन्यांपासून राज्यातील विविध किल्ल्यांवर अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून स्वच्छता, दुरुस्ती आणि जनजागृतीचे काम सातत्याने सुरू आहे.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचे सांगितले. इतिहास जपला नाही तर समाज योग्य दिशा गमावू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. तसेच तरुणांनी किल्ल्यांवर जाऊन प्रत्यक्ष इतिहास अनुभवावा, असे आवाहन करण्यात आले.
एकूणच, या मोहिमेमुळे लोहगड किल्ल्यावर स्वच्छतेसह पर्यटन सुविधा वाढण्यास मदत होणार असून, इतिहास जतन करण्याची जाणीव समाजात अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा
– लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल
– शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण
