Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा तसेच पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर महत्त्वपूर्ण हालचाली सुरू आहेत.
दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी मंत्रालयात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पवना धरणग्रस्त शेतकरी आणि संबंधित कृती समित्यांच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात सकारात्मक चर्चा होऊन, ९ मे १९७३ च्या शासन निर्णयानुसार जमीन वाटप, जमिनीची नव्याने मोजणी, पुनर्वसन गावांना गावठाणाचा दर्जा तसेच इतर महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले होते.
याच बैठकीच्या अनुषंगाने आता महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता मंत्रालय, मुंबई येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यमंत्री (वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस मदत व पुनर्वसन, जलसंपदा व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पुणे जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीसाठी रविंद्र भेगडे, पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके, बाळासाहेब मोहोळ, दत्तात्रय ठाकर, रविकांत रसाळ, ॲड. संजय खैरे , तसेच पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, माऊली सोनवणे, भरत ठाकूर, दिलीप ढमाले, नारायण भालेराव यांना अधिकृत निमंत्रित करण्यात आले आहे.
पवना धरणग्रस्त शेतकरी बांधवांचे पुनर्वसन आणि बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी रविंद्र (आप्पा) भेगडे हे सातत्याने शेतकरी बांधवांच्या वतीने शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. १९ नोव्हेंबरच्या बैठकीनंतर २६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली ही बैठक या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पवना धरणग्रस्त शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर ठोस निर्णय व्हावेत, यासाठी आपला पाठपुरावा कायम राहील, असा विश्वास रविंद्र भेगडे यांनी व्यक्त केला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे ; सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू
– पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा
– राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
– ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश ; राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ‘३१०’

