Dainik Maval News : संविधान दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) राज्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले संवर्धन व स्वच्छता अभियानाचे’ लोकार्पण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सामाजिक न्याय विभाग तसेच पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड, शिवनेरी आणि लोहगड या तीन किल्ल्यांवर गुरुवारी सकाळी ९ वाजता एकाच वेळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून ऐतिहासिक वारसा जतन करण्याबरोबरच गडकिल्ल्यांवरील स्वच्छता, पर्यावरणाचे रक्षण आणि पर्यटनस्थळांबाबत नागरिकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात उपस्थितांना भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून शपथ देण्यात येणार आहे. संविधानातील मूल्यांचा जागर करतानाच ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
महाराष्ट्राला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणारे गडकिल्ले ही राज्याची महत्त्वाची सांस्कृतिक संपत्ती आहे. या वारशाचे जतन करणे, किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता राखणे तसेच पर्यटकांनीही स्वच्छतेचे नियम पाळून या ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य आणि पर्यावरण अबाधित ठेवणे आवश्यक आहे. या दृष्टीने अभियानाच्या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे ; सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू
– पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा
– राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
– ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश ; राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ‘३१०’
