वडगाव मावळ, दि. ७ (प्रतिनिधी) : मावळ तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा, हिंजवडी शहर ते तळेगाव ( नवलाख उंबरे) एमआयडीसी आणि निगडी शहर ते लोणावळा शहर ह्या दोन नवीन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी द्यावी, अशी आग्रही माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह याठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाळा भेगडे यांनी ही मागणी केली. या दोन्ही विकास प्रकल्पांमुळे मावळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होईल.
निगडी ते लोणावळा मेट्रो मार्ग :
पर्यटनाचा तालुका म्हणून प्रसिद्ध मावळ तालुक्यात असलेला पर्यटनाचा वाव पाहता, निगडी ते लोणावळा मेट्रो मार्ग सुरू झाल्यास प्रवाशांना जलद, सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. यामुळे मावळ तालुक्यातील पर्यटनवाढीला चालना मिळेल.
हिंजवडी ते तळेगाव नवलाख उंब्रे एमआयडीसी मेट्रो प्रकल्प :
हिंजवडी आयटी पार्क ते तळेगाव, नवलाख उंब्रे एमआयडीसी हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा पट्टा असून या भागात मोठ्या प्रमाणावर कामगार, कर्मचारी व उद्योजकांची ये-जा सुरू असते. अशात हिंजवडी ते तळेगाव एमआयडीसी मेट्रो प्रकल्पामुळे या भागातील उद्योगांना चालना मिळून रोजगाराच्या संधी वाढतील, तसेच वाहतूक व्यवस्था सुधारून परिसराचा सर्वांगीण विकास होईल.
मावळ तालुक्याच्या दृष्टीने हे दोन्ही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असून भविष्यातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने लक्ष देत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्याचे आश्वासन दिले.
मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी, नवलाख उंब्रे एमआयडीसी हे आशियातील सर्वात मोठे औद्योगिक हब तयार झाले आहेत. त्यामुळे या परिसरात रोजगारासाठी मोठ्या संख्येने हिंजवडी, पिंपरी-चिंचवड परिसरातून अधिकारी, कामगारवर्ग ये-जा करतात. परंतु वाहतूक कोंडी, वाहतूक सुविधेचा अभाव यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच मावळ तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा तालुका असून लोणावळा, कार्ला, खंडाळा परिसरात देशभरातून पर्यटक येत असतात. त्यामुळे हिंंजवडी ते तळेगाव ( नवलाख उंब्रे ) एमआयडीसी आणि निगडी ते लोणावळा या दोन्ही मार्गावर मेट्रो प्रकल्प झाल्यास मावळ तालुक्याचा चेहरामोहरा बदलेल. मुख्यमंत्र्यांनीही या मागणीकडे सकारात्मक पाहिले असून यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. – बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री (माजी आमदार – मावळ विधानसभा)
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशाचे पालन करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 संचालकांचे राजीनामे, 4 संचालकांकडून मात्र ‘वेट अँड वॉच’ची भूमिका
– लोणावळा शहराचा ‘स्मार्ट सिटी’ धर्तीवर विकास आराखड्यास गती ; ‘एआय’ आधारित CCTV, रस्ते सुशोभीकरण व ट्रॅफिक व्यवस्थापनावर भर
– आजिवली येथील रक्तदान शिबिरात १५ महिलांसह एकूण ८० जणांचे रक्तदान ; २३१ जणांची मोफत नेत्र तपासणी
– भाजपाचा धोबीपछाड, नेत्यांचा थयथयाट ! बाजार समितीतील राष्ट्रवादीच्या सर्व संचालकांना राजीनामे देण्याचे आदेश ? नक्की काय घडलं