Dainik Maval News : मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष संघटना मजबूत करण्याच्यादृष्टीने आंदर मावळ,नाणे मावळ आणि पवन मावळ विभागानुसार संघटनात्मक नियुक्ती जाहीर केल्या असून, यामध्ये अनुभवी व नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते व आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष नामदेव ठुले, ग्रामीण ब्लॉकचे अध्यक्ष तानाजी पडवळ, प्रवक्ते राज खांडभोर उपस्थित होते.
आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी भरत लष्करी यांची निवड करण्यात आली असून, नाणे मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्व विभाग अध्यक्षपदी साईनाथ गायकवाड तर, पश्चिम विभाग अध्यक्षपदी किसन राणे यांची निवड करण्यात आली आहे. पवन मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्व विभाग अध्यक्षपदी भरत भोते, तर पश्चिम विभाग अध्यक्षपदी लाला गोणते यांची फेरनिवड करण्यात आली आहे. नव्या नियुक्त्यांमधून तरुण व सक्रिय नेतृत्वाला संधी देतानाच अनुभवी पदाधिकाऱ्यांवर पुन्हा जबाबदारी सोपविण्यात आल्या आहेत.
मावळातील अधिकाधिक नागरिकांना पक्षाच्या विचारांशी जोडून घेत गावागावांत संघटनात्मक जाळे मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. पदाधिकाऱ्यांनी नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी आणि पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, असे आवाहन गणेश खांडगे यांनी केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू
– मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन
– मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक


