Dainik Maval News : पुणे जिल्ह्यात गाजलेल्या मावळातील किशोर आवारे हत्या प्रकरणातील आरोपी क्रमांक 8 चंद्रभान उर्फ भानू खळदे याचा जामीन वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने रद्द केला आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी 1 ऑक्टोबर 2026 रोजी हा आदेश दिला. खळदे यांनी 16 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी न्यायालयात हजर राहून न्यायालयीन कोठडीत शरण यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
खळदे यांना 4 एप्रिल 2024 रोजी जामीन मंजूर झाला होता. खटल्यातील साक्षीपुरावा सुरू झाल्यानंतर फिर्यादी सुलोचना आवारे यांनी 22 जानेवारी 2026 रोजी तक्रार देत खळदे आणि इतरांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना न्यायालयात साक्ष देऊ नये किंवा साक्ष बदलावी यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला होता.
पोलिसांचा अहवाल, साक्षीदारांचे जबाब, अभियोग पक्षाची कागदपत्रे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने जामिनाच्या अटींचे हेतुपुरस्सर उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे नमूद करत जामीन रद्द केला.
साक्षीदारांवर दबाव, धमक्या आणि प्रलोभन दिल्याचे आरोप हे अद्याप अभियोग पक्षाच्या प्रकरणाचा भाग असून त्यावर अंतिम निर्णय खटल्याच्या पुढील प्रक्रियेत होणार आहे.


