Dainik Maval News : घोरवाडी स्टेशनजवळील श्री मरिमाता मंदिर येथे रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) खेळ रंगला पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम रंगणार असून, महिलांसाठी विविध स्पर्धा, मनोरंजन आणि भरघोस बक्षिसांची मेजवानी हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
या कार्यक्रमाला निवेदक व सिनेअभिनेता अविनाश शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गायिका अमृता झा यांच्या सुरेल गायनामुळे कार्यक्रमात संगीताची रंगतही वाढणार आहे. महिलांना मनोरंजनाची संधी मिळण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि कोजागिरी पौर्णिमेचा आनंद एकत्रितपणे साजरा करता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
खेळ रंगला पैठणीचा स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या महिलेला मानाची पैठणी, सोन्याची नथ आणि चांदीचे पान देऊन गौरविण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी मानाची पैठणी, चांदीचा छल्ला व चांदीचे पान, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्या महिलेला मानाची पैठणी, चांदीचे पैंजण आणि चांदीचे पान देण्यात येणार आहे.
याशिवाय लकी ड्रॉमधून फ्रिज, टीव्ही, सायकल, गॅस शेगडी, कूलर, फॅन, मिक्सर, सीलिंग फॅन, प्रेशर कुकर, डिनर सेट, इस्त्री, घड्याळ, नॉनस्टिक तवा आणि मेकअप बॉक्स अशी विविध आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उपस्थितांसाठी सुगंधी मसाला दुधाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश
– लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’
– जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

