महविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे सत्तेच्या काळात काहीच काम केले नाही आणि आता भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना युती सरकार काम करत असताना आघाडीतील घटक पक्ष खोटा नॅरेटीव्ह चालवून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पेरत आहेत व युती सरकारची प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला. खोटे सांगाल तर भाजपाची संघटना रस्त्यावर उतरून विरोध करेल, असा इशारा त्यांनी दिला. ( BJP Maharashtra State President Chandrashekhar Bawankule Press Conference at Thane )
ठाणे जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासाच्या अंतर्गत ते भिवंडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, भाजपा ठाणे विभाग संघटनमंत्री हेमंत म्हात्रे, भाजपा भिवंडी जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी आणि आमदार महेश चौघुले उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘सत्ता गमावल्यानंतर आघाडीतील घटक पक्ष सातत्याने चुकीची माहिती पेरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका करत आहेत. युती सरकारचे जाणीवपूर्वक नुकसान करून प्रतिमा खराब करत आहेत. पण भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. खोटे सांगाल तर भाजपाची संघटना रस्त्यावर उतरून खोट्याचा विरोध करेल. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात राज्याला बर्बाद केले, त्याबद्दलचे सत्य जनतेसमोर सांगू’, असे बावनकुळे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरानंतर युती सरकार कोसळेल, असे भाकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वर्तवले , त्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, केवळ भाजपाला दूर ठेवण्यासाठी आणि सत्ता मिळवून भ्रष्टाचार करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र आले होते. आता त्यांना ध्यानात आले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडे भक्कम बहुमत आहे. हे सरकार अधिकाधिक काम करेल, तसा या पक्षांमध्ये असंतोष उफाळून येईल.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना थांबविण्यासाठी आणि आमदारांची अस्वस्थता कमी करण्यासाठी जयंत पाटील यांनी हे विधान केले आहे, असे बावनकुळे म्हणाले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी केलेले अफाट कार्य, त्यांची राज्याच्या विकासाची व्हिजन, त्यांनी केलेला त्याग आणि त्यांचे उत्तूंग नेतृत्व याचा विचार करावा तसेच आपली राजकीय उंची किती याचाही विचार करावा, असा टोला प्रदेशाध्यक्षांनी एका प्रश्नाच्या उत्तरात लगावला.
अधिक वाचा –
– Video : खळबळजनक! शिवसेना नेत्याची चारचौघात हत्या, मंदिराबाहेर आंदोलन करत असतानाच गोळीबार
– “तेंडूलकरच्या 10 हजार धावांपेक्षा सावरकारांनी भितींवर लिहिलेल्या 10 हजार ओव्यांचे अधिक कौतूक वाटले पाहिजे”