Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवर किलोमीटर 36.500 जवळ सोमवारी (दि. 1 जून) पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडला. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांचा समावेश असलेल्या या अपघातात ट्रक चालक व क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघेजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तांदूळ भरलेल्या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. याचवेळी बाजूने जाणाऱ्या एर्टिगा कारलाही धडक लागल्याने अपघाताची तीव्रता वाढली. धडकेनंतर तांदूळ भरलेला ट्रक आणि खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर रस्त्यावर पलटी झाला.
या अपघातात ट्रक चालक व क्लिनर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून एर्टिगा कारमधील एका प्रवाशाला गंभीर तर अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींमध्ये लिलाबाई सस्ते (वय 80), मुकिंदा सस्ते (वय 56) आणि महेंद्र पाल (वय 39) यांचा समावेश आहे.
अपघातामुळे तांदळाच्या बॅगा आणि खाद्य तेल रस्त्यावर विखुरल्याने काही काळ द्रुतगती मार्गावरील चारही लेन प्रभावित झाल्या होत्या. जखमींना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालय तसेच एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे हलविण्यात आले.
अपघातग्रस्त वाहने आणि रस्त्यावर पडलेला माल हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या मदतकार्यात महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशन, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल आणि हेल्प फाउंडेशन अशा विविध यंत्रणानी सहभाग घेतला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
– पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना
– भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
– जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना