आदिम सेवा अभियान अंतर्गत मावळ तालुक्यातील इंदोरी व सुदुंबरे येथील 284 आदिवासी ठाकर बांधवांना मंगळवारी (दिनांक 15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ‘जात प्रमाणपत्राचे वाटप’ करण्यात आले. आमदार सुनिल शेळके ह्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्याच हस्ते आदिवासी बांधवांना दाखले वितरीत करण्यात आले. ( distribution of caste certificate to 284 tribal thakar brothers of indori and sudumbare village in maval taluka )
‘आपण एकीकडे देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही आदिवासी ठाकर समाजातील अनेक बांधव जातीच्या दाखल्यांपासून वंचित आहेत. शैक्षणिक कामांसाठी,शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. परंतु ज्यांचे पूर्वज शिक्षणाच्या प्रवाहापासून दुर होते तसेच भूमिहीन होते, अशा कुटुंबातील नागरिकांना मात्र जात प्रमाणपत्र काढण्यासाठी मानसिक त्रास सहन करावा लागतो.’
‘आजपर्यंत विविध शिबिरे,योजनांच्या नावाखाली केवळ कागदपत्रे जमा केली जात होती. परंतु अखेरपर्यंत पाठपुरावा करुन सर्व प्रक्रिया पूर्ण करुन कोणीही दाखले मिळवुन देत नव्हते. त्यामुळे आश्वासनांशिवाय या बांधवांच्या पदरात काहीच पडले नव्हते. प्रत्येक वेळी दाखला काढण्यासाठी कागदपत्रांची करावी लागणारी जुळवाजुळव आणि सरकारी कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे आणि एवढे करुनही दाखले मिळत नव्हते, त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागायचा.’
“आज हा समाज सक्षम होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना पाठबळ देणे हे माझे कर्तव्य आहे.निःस्वार्थ भावनेने काम करायचे ठरविल्यास आशेचा किरण हा नक्कीच दिसतो आणि याच भावनेने प्रत्येक वाडी-वस्तीवर जाऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन घेणे व शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे यामुळे हे अभियान यशस्वी झाले. माझ्या बांधवांना त्यांचा अधिकार मिळाला याचे मला समाधान आहे. फक्त आश्वासने न देता त्यांच्या समस्या प्रत्यक्षात सोडविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील,’ असे आश्वासन प्रमाणपत्रे वाटपावेळी आमदार सुनिल शेळके यांनी दिले.
सदर कार्यक्रमाला आमदार सुनिल शेळके यांच्य़ासमवेत, मावळ-मुळशी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, दिपक हुलावळे, इंदोरी सरपंच शशिकांत शिंदे, उपसरपंच धनश्रीताई काशीद, मंडलाधिकारी बजरंग मेकाले आणि इंदुरी, सुदुंबरे येथील आजी-माजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– रेल्वे सुरक्षा बलाकडून व्हिपीएस विद्यालयात रेल्वे सुरक्षेचे धडे । Lonavala News
– दैनिक मावळ बुलेटीन : ‘पुणे मेट्रोचे स्टिअरिंग मावळ कन्येच्या हाती’ । ‘त्या’ ग्रामपंचायत सदस्यांवरील कारवाईला स्थगिती
– प्रवासासाठी घराबाहेर पडताय? ही बातमी वाचा… द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी!