Dainik Maval News : मावळ तालुक्यातील घोणशेत व परिसरामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे भात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने कोणत्याही अटी-शर्तींशिवाय हा परिसर तातडीने ‘१००% दुष्काळग्रस्त’ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बाळाभाऊ भेगडे यांनी यावेळी केली.
घोणेशेत परिसरातील शेतांमध्ये जाऊन पाहणी करताना बाळा भेगडे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पावसात पडलेल्या खंडामुळे उभी पिके जळून खाक झाली असून शेतकऱ्यांचे मोठे भांडवली नुकसान झाले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, “संकटाच्या काळात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. महसूल व कृषी विभागाने तातडीने संयुक्त पंचनामे करावेत. पिकांची नुकसानभरपाई, वीजबिल माफी आणि पीककर्ज सवलत देऊन बळीराजाला दिलासा मिळवून देण्यासाठी शासन दरबारी जोरदार पाठपुरावा केला जाईल.”
या पाहणी दौऱ्यावेळी भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, माजी सदस्य सचिन घोटकुले, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आतिश परदेशी, मावळ खरेदी-विक्री संघाचे माजी सभापती शिवाजी असवले, लोणावळा शहर भाजपा मंडल अध्यक्ष अनिल गायकवाड, आंदर मावळ मंडल अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, तळेगाव मंडल सरचिटणीस मनोहर भेगडे तसेच वडगाव नगरपंचायतीचे नगरसेवक अनंता कुडे उपस्थित होते.
याशिवाय वडगाव शहराचे माजी सरपंच संभाजी म्हाळसकर, मंगरूळचे माजी सरपंच नामदेव भसे, कामशेत शहर भाजपा अध्यक्ष प्रवीण शिंदे, जांभूळ भाजपा अध्यक्ष अमोल धिडे, आंदर मावळ मंडल सरचिटणीस संजय बिनगुडे, टाकवे बुद्रुक भाजपा अध्यक्ष दत्ता असवले, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष किरण जगताप, नागाथलीचे माजी सरपंच कैलास खांडभोर, घोणशेतचे उपसरपंच योगेश चोरगे, राहुल कराळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर
– कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन
– वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय
– पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे
