Dainik Maval News : परतीच्या पावसाने दडी मारल्याने मावळ तालुक्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाताच्या ओंब्या भरल्या नाहीत. त्यामुळे भाताचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. मावळ तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. अधिकाऱ्यांनी तत्काळ नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत, अशा सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
खासदार बारणे यांनी मंगळवारी मावळ तालुक्यातील नाणे मावळ परिसरातील पावसाअभावी नुकसान झालेल्या भात शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलासा दिला.
खासदार बारणे म्हणाले, मावळ तालुक्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली. मावळात बारा हजार २८ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. ज्या शेतात कालपर्यंत हिरवीगार भाताची रोपे डोलत होती. त्याच शेतात आज पाण्याअभावी जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. रोपांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी उभ पीक करपून गेले आहे. भाताच्या ओब्या भरल्या नसल्याने शंभर टक्के नुकसान झाले आहे.
सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस झाला नसल्याने मावळातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मावळातील शेतकरी प्रामुख्याने भाताचेच पीक घेतो. यंदा भाताचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे तत्काळ पाहणी करून पंचनामे करावेत. दोन दिवसांत अहवाल द्यावा. हा अहवाल राज्य शासनाला पाठवून शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत करण्याची सूचना खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.
यावेळी कृषी अधिकारी मारुती साळे, सहाय्यक कृषी अधिकारी पांचाली गायकवाड, शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडभोर, मावळ तालुका प्रमुख राम सावंत, मावळ उप तालुका प्रमुख सोमनाथ कोंडे, तालुका संघटक अमित कुंभार, चंद्रकांत भोते, युवासेना उप जिल्हा प्रमुख दत्ता भाऊ केदारी, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, युवासेना मावळ तालुका प्रमुख विशाल लोखंडे, नवनाथ हरपुडे, निलेश वाघमारे सुदेश लाड, माजी सभापती गणेश गायकवाड, राष्ट्रवादी मावळ तालुका सरचिटणीस देवा गायकवाड, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व शेतकरी वर्ग उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर
– कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन
– वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय
– पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे
