मावळ तालुक्याचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (बुधवार, दिनांक 3 मे) केली. मागील काही महिन्यांपूर्वी बाळा भेगडेंवर जवळपास 16 लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी 16 लोकसभा क्षेत्रात प्रवास करून ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. म्हणूनच आज त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदी निवडल्याचे बोलले जाते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बाळा भेगडे यांना मागील दोन वर्षांपूर्वी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली गेली होती. तेव्हाही बाळा भेगडे हे महिनाभर पंढरपूर-मंगळवेढा इथे आपल्या कार्यकर्त्यांबरोबर तळ ठोकून काम करत होते. त्यांच्या बुथ कमिटीने नियोजनबद्ध प्रचारकार्य केल्याने भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले होते.
त्यानंतर काही महिन्यांपूर्वी झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सांखळी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी भेगडेंवर देण्यात आली होती. तिथे देखील त्यांनी आपल्या प्रभावी नियोजन शैलीने प्रमोद सावंत यांच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला.
यासह बाळा भेगडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यामुळेच आजवर बाळा भेगडेंना वेगवेगळ्या राज्यांमधील जबाबदारी मिळणे, ही मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मोठी जबाबदारी मिळाली, असं समजून भेगडेंचे राजकीय वजन वाढत गेले.
त्यामुळेच आज प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बाळा भेगडेंना प्रदेश उपाध्यक्ष केल्याने मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अधिक वाचा –
– स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे नेते बाळासाहेब गायकवाड यांचे आकस्मिक निधन, मावळ तालुक्यात हळहळ
– ‘शिवदुर्ग मित्र’कडून आयोजित ‘लोणावळा बोल्डरींग चॅम्पियनशिप 2023’ स्पर्धा उत्साहात संपन्न, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी