मावळ लोकसभा मतदारसंघ म्हटलं की एकीककडे डोळ्यांसमोर येतात उद्योगधंदे – शहरं आणि दुसरीकडे दिसतात ते गावखेडे आणि निसर्गसंपन्न प्रदेश. असा आगळावेगळा आणि विस्तीर्ण मतदारसंघ असलेला मावळ हा राज्यातील एक प्रमुख आणि केंद्रस्थानी असलेला मतदारसंघ. 2009 साली पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघ आणि रायगड जिल्ह्यातील तीन मतदारसंघ जोडून मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
2009 साली प्रथम झालेल्या मावळ लोकसभा निवडणूकीत शिवसेना पक्षाने मावळच्या खासदारकीचा श्री ‘गणेशा’ केला. 2009 साली गजानन बाबर आणि 2014, 2019 असे सलग दोन टर्म शिवसेनेचेच श्रीरंग बारणे खासदार झाले. शिवसेना – भाजपा युतीचा खासदार म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात नेहमीच शिवसेनेचे धनुष्यबाण विजयी होत राहिले. यामागे ‘ठाकरे’ हा फॅक्टर खुप महत्वाचा होता. कोकण आणि त्यातही रायगड हा शिवसेनेसाठी महत्वाचा भाग आहे. येथूनच शिवसेना भक्कम बनली आणि हळूहळू राज्यभर पसरत गेली. रायगडच्या जोडीलाच मावळचा भाग असल्याने या भागातही शिवसेना पक्ष चांगल्या प्रकारे रुजला. पुढे शिवसेना या रोपट्याचा वटवृक्ष झाला, तेव्हा त्याची भक्कम मुळे ही कर्जत-खालापूर, मावळ भागातही होती. त्यामुळे 2009 ची निवडणूक असो की मोदी लाटेतल्या 2014, 2019 च्या निवडणूका असो, ठाकरेंचा शब्द पाळून या ठिकाणच्या मतदारांनी बहुमताने शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला उचलून धरले. ( Maval Lok Sabha Constituency latent wave towards Shiv Sena Uddhav Thackeray Party candidate Sanjog Waghere )
आझमभाई पानसरे, लक्ष्मण जगताप, राहुल नार्वेकर, अजितदादांचे सुपूत्र पार्थ पवार अशा दिग्गजांचा पराभव मावळच्या जनतेने करून दाखवला आणि ठाकरेंचा शब्द उचलून धरत शिवसेनेच्या उमेदवारालाच तिन्ही वेळी लोकसभेत पाठवले. परंतू, आता परिस्थिती बदलली आहे. शिवसेना-धनुष्यबाण आणि ठाकरे यांची फाटाफूट झाली आहे. ठाकरेंकडे जरी अर्धवट स्वरूपात शिवसेना हे नाव असले, तरीही धनुष्यबाण नाही. अशात मावळ लोकसभा मतदारसंघात प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थात शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी निवडणूक होत आहे, आणि स्पष्टपणे शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना होताना दिसतोय. या परिस्थितीत मावळच्या मतदारांमध्ये काय भावना आहे, याचाही विचार केला पाहिजे.
2022 साली शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांच्या सहाय्याने शिवसेना पक्षातील न भूतो न भविष्यती असे बंड केले. पुढे या बंडखोरीत आणि न्यायालयीन लढाईत संपूर्ण शिवसेना पक्षच चिन्ह, नावानिशी एकनाथ शिंदे यांच्या हाती गेला. हळूहळू अनेक नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनी एकनाथ शिंदे यांच्या गोटात गेले. शिवसेनेची ही फाटाफूट सर्वांनाच रुचणारी होती असे नाही. त्यामुळे बंडखोरांविरोधात ठिकठिकाणी निदर्शने आणि विरोधाच्या बैठका होत होत्या. यात मावळचं नाव सर्वात आघाडीवर होतं. पुढे मावळचे खासदार श्रीरंग बारणे हेही शिंदेसोबत गेले. त्यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि शिवसैनिकांनी वडगाव येथे घेतलेला मेळावा सर्वांच्या लक्षात आहे.
अशात आता मावळ लोकसभेत श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्या रुपाने थेट शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना होताना दिसतोय. त्यामुळे शिवसैनिक म्हणवणारे आणि ठाकरेंना मानणारे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला मानणारे सर्वच तळगाळातील कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसतंय. गावागावात, शहरातील गल्लीबोळात हे कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हाचा आणि उमेदवार संजोग वाघेरे यांच्या नावाचा आग्रहाने प्रचार प्रसार करत आहेत. त्यांच्या या पुढाकाराने मावळ मतदारसंघात उद्धव ठाकरेंबाबत एक सहानुभूतीची सुप्त लाट तयार होत असून त्याचा फायदा संजोग वाघेरे यांना हाईल, असं चित्र सध्या दिसत आहे.
अधिक वाचा –
– मावळ लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक आणि मतदान कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या मतदानाचे वेळापत्रक जाहीर
– गोविंदा आला.. गोविंदा आला.. पण ज्यांच्यासाठी आला त्यांचे नावच विसरला ! ‘आदरणीय’ बोलून विषय संपवला । Maval Lok Sabha
– मावळ लोकसभेत महायुतीत खदखद, त्यामुळे थेट दिल्लीतून आलंय पथक ? पाहा काय झालं या पथकाचं… । Maval Lok Sabha