मावळ तालुक्यातील नाणे मावळ मधील ग्रुप ग्रामपंचायत घोणशेत अंतर्गत लंकेवाडी येथील 40 कुटुंबे, त्यामधील 250 ते 270 लोकसंख्या असणाऱ्या नागरिकांचा कदमवाडी ते लंकेवाडीपर्यंत 1800 मीटरचा रस्ता त्यामधील काही रस्त्याचे अंतर नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. ( Maval taluka Kadamwadi to Lankawadi road incomplete possibility of losing funds of lakhs of rupees )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान या रस्त्याने नागरिकांना लंकेवाडीला पोहोचण्यासाठी. तसेच या वस्ती शेजारी पाण्याचे तळे व शेती असल्याने या भागातील पाळीव जनावरांना पिण्यासाठी पाणी, नागरिकांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी माजी मंत्री बाळा भेगडे, विद्यमान आमदार सुनिल शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे आणि दत्ता शेवाळे या सर्वांच्या माध्यमातून जवळपास 35 लाख रुपयांचा फंड कदमवाडी ते लंकेवाडी असा 1800 मीटरच्या रस्त्यासाठी टप्प्याटप्प्याने वापरण्यात आला होता.
परिणामी लंकेवाडी येथील नागरिकांना त्यांच्या वस्तीपर्यंत आणि इतर कामधंद्याला पोहोचण्यासाठी सुखकारक झाले होते. मात्र पूर्वीच्या काळी ज्यांनी जागा खरेदी केल्या त्याजागा मालकांनी जागा हस्तांतरित केल्याने रस्त्यामध्ये उत्खनन करून कंपाऊंड केले आहे. परिणामी या रस्त्यासाठी सरकारने केलेला लाखो रुपयाचा फंड वाया जाणार असून रस्ता नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे.
दरम्यान येथील अनेक स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी देखील या रस्त्यामध्ये गेल्या आहेत. त्यांना रस्ता उपलब्ध होत नसल्याकारणाने त्यांनी देखील त्यांच्या जागा हस्तांतरित केल्या आहे. परिणामी लंकेवाडी येथील 40 कुटुंबांना रस्त्याची खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान 1800 मीटरच्या रस्त्यामध्ये 450 मीटरला डांबरीकरण व काँक्रिटीकरण झालेले आहे. बाकी ठिकाणी रस्त्याला मुरूमीकरण झाले होते त्या रस्त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी त्यांच्या हद्दीप्रमाणे जागा संपादित केल्या आहेत.
लंकेवाडी या भागातील चाळीस कुटुंबाचे दळणवळणाचे साधन बंद होण्याच्या मार्गावरती आहे. या चाळीस कुटुंबाची समस्या सोडवण्यासाठी माजी आमदार बाळा भेगडे व विद्यमान आमदार सुनील शेळके खरंच लक्ष देणार का? या बिकट परिस्थिती मधून येथील नागरिकांची खरच सुटका होणार का? हे आता पहावे लागेल.
हेही वाचा – कार्ला फाटा जवळ भीषण अपघात; मनसे पदाधिकाऱ्यांकडून अपघातास कारण ठरलेल्या गाडी चालकाला जागेवरच ‘प्रसाद’
लंकेवाडी येथील रहिवासी नागरिकांनी, व सरपंच अंकुश खरमारे यांनी तहसील कार्यालय वडगाव मावळ येथे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, “ग्रुप ग्रामपंचायत घोणशेत अंतर्गत लंकेवाडी येथे जवळपास 40 घरांची वस्ती असून येथील लोकसंख्या 250 ते 270 एवढी आहे. यात लहान मुले असून तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व युवकांना कामधंद्याला जाण्यासाठी रस्त्यामुळे अडचणी येत आहेत. त्यात आजारी वयोवृध्द, गरोदर महिलाना रस्त्याच्या असुविधेमुळे अडचणी निर्माण होत आहे. मागील वर्षी लंकेवाडी रहिवासीच्या मागणीवरून रस्त्याचे काम सुरु झाले होते. त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यालगत असल्याने रस्त्याला हरकती येत असून शेतकरी आपल्या जागा देण्यास तयार नाहीत.”
“दरम्यान काही ठिकाणी रस्त्याचे काम बंद पडले आहे. त्यामुळे रस्ता अर्धवट झाला. व तसेच लंकेवाडी ग्रामस्थांना या रस्त्याने प्रवास करणे सोयीचे नसून त्यावर तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करून रस्ता पूर्वरत सुरु करावा व उर्वरित काम लवकरात लवकर पुर्ण करावे”, असे निवेदनात म्हटले आहे.
“या रस्त्यामध्ये जवळपास माझी वैयक्तिक एक एकरपर्यंत जागा जात आहे. या भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना असुविधा होऊ नये यासाठी मी रस्त्याचा काही भाग खुल्ला ठेवलेला आहे. तसेच समोरच्या शेतकऱ्याने रस्त्यासाठी पाच फूट जागा दिली तर मी देखील पाच फूट देण्यास सहमत आहे. त्यामुळे दहा फूट रस्ता निर्माण होईल, यामध्ये माझी एक एकर जागा जात असल्यामुळे माझे खूप मोठे नुकसान होत आहे”, असे स्थानिक शेतकरी आदिनाथ शिंगाडे यांनी सांगितले.
हेही वाचा – मावळकरांना गुडन्यूज..! सोमाटणे टोलनाक्यावर फास्टॅगमधून कट झालेले पैसे परत मिळणार, आयआरबीचे पत्र, लगेच वाचा
“लंकेवाडी येथे तलाठी ऑफिसचे काम पूर्व तत्वास आले असून या भागामध्ये कचरा व्यवस्थापनाचा आराखडा देखील तयार करण्यात आलेला आहे. रस्ता बंद झाला तर याचा उपयोग कसा होणार हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच स्थानिक शेतकऱ्यांना व नागरिकांना रस्त्यामुळे होणाऱ्या अडचणीतून तत्काळ सुटका मिळावी. वैयक्तिक कोणत्याही एका शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये यासाठी ग्रामपंचायत मार्फत ठराव करून तहसील कार्यालय वडगाव मावळ या ठिकाणी दिलेला आहे. संबंधित जागा मालकांना तहसीलदारांनी नोटीस बजावून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा,” असे सरपंच अंकुश खरमारे यांनी सांगितले आहे.
तहसीलदार वडगाव मावळ मधुसूदन बर्गे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, “त्या भागामध्ये जाऊन स्थळ पाहाणी करून त्यानंतर निर्णय घेतला जाईल. मालकी जागा असेल तर त्यामधून सरकारला असा रस्ता करता येत नाही, त्यासाठी 143 अन्वये अर्ज करून स्थर बांधावरून नवीन रस्ता करता येऊ शकतो,” अशी माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.
“नकाशावरती हा पानंद रस्ता दाखवत नाही, काही ठिकाणी अर्धवट पुसट रेषा दिसत आहेत, त्यामुळे नक्की काय आहे हे मी सांगू शकत नाही. येथील जुन्या नागरिकांचे म्हणणे आहे की आम्ही पूर्वीपासून शेती करण्यासाठी पायवाटेने हाच रस्ता वापरत होतो,” अशी माहिती तलाठी किरण जगताप यांनी दिली.
माहिती : टाकवे बुद्रुक प्रतिनिधी – चंद्रकांत असवले
अधिक वाचा –
– बिल्डर्स सुविधा देत नाही, तरीही पीएमआरडीएकडून सदनिका पूर्णत्वाचा दाखला मिळतोच कसा? – आमदार शेळके
– शिवली सोसायटीचा निकाल जाहीर; भाजपचा राष्ट्रवादीला धोबीपछाड, ‘या’ गोष्टीमुळे मात्र चिंता कायम