जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत चऱ्होली पाणीपुरवठा योजनेला मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणातून पाणी उचलण्यास धरणाच्या पंचक्रोशीतील गावांनी विरोध केला असून, ही योजना बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ( Opposition to Charholi water supply scheme from Jadhavwadi Dam area letter to Tehsildar )
सुदुंबरे गावचे माजी सरपंच माणिक गाडे, रामदास गाडे, बाळासाहेब गाडे, नवलाख उंब्रे गावचे माजी सरपंच दत्तात्रेय पडवळ, नवनाथ पडवळ, बापूसाहेब दरेकर, बापूसाहेब बोरकर, बाळा आंबोरे, विनायक गाडे, रमेश कराळे, बाळासाहेब जाधव आदी पदाधिकारी व ग्रामस्थांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काय म्हटलंय निवेदनात?
जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत चऱ्होली पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे. या पाणीपुरवठा योजनेसाठी जाधववाडी धरणातून पाणी उचलण्यात येणार आहे. त्यास पंचक्रोशीतील गावांचा तीव्र विरोध आहे. कारण या योजनेमुळे जाधववाडी धरणातील पाणीसाठा कमी होणार असून, पंचक्रोशीतील शेतकरी व रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या धरणातून सध्या नवलाख उंब्रे, बधलवाडी, जाधववाडी, मिंडेवाडी, इंदोरी या सर्व गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उचलले जात आहे. त्याचप्रमाणे धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर सुदुंबरे, सुदवडी, शिंदे वासोली, येलवाडी, जांबवडे त्याचप्रमाणे भंडारा डोंगर देवस्थान, वारकरी व देहू यात्रा (देहू बीज) अवलंबून असते.
सद्यःस्थितीतच उन्हाळ्यात या सर्व गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे भविष्यातील विचार करता या भागात वाढती एमआयडीसी व त्या अनुषंगाने वाढते शहरीकरण लक्षात घेता या भागातील गावांना अजून पाण्याची गरज आहे. जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे या गावांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर असून त्यांचे कामही चालू आहे. त्यामुळेही धरणातील पाणीसाठा कमी होणार आहे. उन्हाळ्यात या धरणातील पाणीसाठा मृत साठ्यापर्यंत जात आहे. ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच पंचक्रोशीतील रहिवासी व शेतकऱ्यांचा चऱ्होली पाणीपुरवठा योजनेला जाधववाडी धरणातून पाणी उचलण्यास तीव्र विरोध आहे. ही योजना तत्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– भाजपाची बूथ सशक्तीकरणासाठी देहूरोड इथे बैठक; मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांचे मार्गदर्शन
– खासदार श्रीरंग बारणे यांची निर्दोष मुक्तता! अनधिकृत बांधकाम कारवाई विरोधात 10 वर्षापूर्वी पुकारले होते आंदोलन
– लई भारी! संपूर्ण पुणे जिल्ह्यात लोकसहभागातून 1200 वनराई बंधारे पूर्ण