Dainik Maval News : पवना धरणग्रस्तांच्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला अखेर गती मिळाली आहे. बुधवारी (दि. १०) सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत धरणग्रस्तांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील) यांच्या अध्यक्षतेखाली आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पुनर्वसनासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे आणि मूलभूत सुविधांसाठी विशेष निधी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
बैठकीत पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या उपलब्धतेस तत्त्वतः मान्यता देण्यात आली. तसेच प्रत्येक धरणग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी दोन एकर क्षेत्र उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने अनेक वर्षांपासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
याशिवाय पुनर्वसित गावठाणांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि इतर मूलभूत नागरी सुविधा उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले. त्यामुळे पुनर्वसित कुटुंबांना सर्व सुविधांनी युक्त जीवनमान उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली.
पवना धरणग्रस्तांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्य शासनाच्या सर्वोच्च स्तरावर बैठक होऊन पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

बैठकीनंतर धरणग्रस्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून पुनर्वसनाचा प्रश्न आता निश्चित मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव, पुनर्वसन विभागाचे सचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, पवना प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन
