शिरोता वनपरिक्षेत्र (मावळ) पुणे वनविभाग मार्फत मौजे बोरवली येथे श्रमदानातुन वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. शिरोता वनपरिक्षेत्र मधील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः श्रमदान करून हा बंधारा पुर्णत्वास नेला. या वनराई बंधाऱ्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास लाभ होणार आहे. ( vanrai dam constructed in Borvali village through shirota forest zone maval )
वनराई बंधारा म्हणजे काय?
नाला किंवा ओढा यातील पाणी यांना स्थानिक रित्या मिळणाऱ्या वस्तूंनी अडवून तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची तजवीज छोट्या प्रमाणात करता येते. याचे बांधकाम सिमेंटची रिकामी पोती, माती ,वाळु,दगड यांच्या सहाय्याने करता येते. याला मोठ्या प्रमाणावर खर्च येत नाही. हा बंधारा वनराई संवर्धनाचे काम करतो म्हणून यास वनराई बंधारा म्हटले जाते.
वनराई बंधारा पक्षी, जनावरे व जंगली प्राणी यांची तहान भागविण्यासाठी लाख मोलाची मदत करणार आहे. गावकऱ्यांनीही वनराई बंधाऱ्यावर अधिक भर देत पाणी अडवून, पाणी जिरविण्याचे आवाहन वन खात्याकडून करण्यात आले. या वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी साठविले जाऊन परिसरातील भुजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
ह्यावेळी सुशील मंतावार वनपरिक्षेत्र अधिकारी – शिरोता, वहाणगाव वनपरिमंडळाचे वनपाल सखाराम बुचडे, वनरक्षक लालासाहेब वाघखपुरे, नवनाथ मिलखे, काजल पाटील, जयश्री गोंदवले तसेच वनकर्मचारी आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्याचे मावळ परिसर तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून कौतुक करण्यात आले आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी ही माहिती दिली.
“चालू वर्षी “एल निनो” च्या हवामान परिणामामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. त्याअनुषंगाने भुजल पातळीत वाढ होण्यास वनराई बंधारे पाणी अडविण्याचे व पाणी जमिनीत जिरवण्याचे लाख मोलाचे काम करण्याबरोबर निसर्गचक्रातील महत्त्वाची भूमिका बजावत असते. पाण्याचे महत्त्व हे कोणत्याच परिमाणात मोजता येत नाही. त्याचा उपयोग आणि महत्त्व प्रत्येकाने जाणले पाहिजे. पाणी अडविले तर भूजल पातळीत वाढ होईल व मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यातही पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल.” सुशील मंतावार – वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता
“नागरिकांनीही वन विभागाने केलेल्या या कामाचा आदर्श घेऊन आपापल्या जवळपास असलेल्या ठिकाणी, जिथे असे काम करता येईल अशा ठिकाणी वनराई बंधारे संबधित अधिकारी यांची परवानगी घेऊन करावेत” – निलेश गराडे (संस्थापक वन्यजीव रक्षक मावळ संस्था) ( vanrai dam constructed in Borvali village through shirota forest zone maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– गणेश भक्तांना टोल माफी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
– तळेगाव नगरपरिषद आणि महिंद्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने स्टेशन भागात देशी प्रजातीच्या 105 वृक्षांची लागवड
– मोठी बातमी! धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी मीडियम शाळांमध्ये असलेली प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय