इनर व्हिल क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने मावळात पहिल्या वहिल्या मावळ श्री भव्य निमंत्रित महिला चषक कुस्ती स्पर्धांचे साईबाबा कुस्ती संकुल येथे आयोजन करण्यात आले. या महिला चषक कुस्ती स्पर्धेत शिरगाव येथील साईबाबा कुस्ती संकुलची महिला कुस्तीगीर सनम शेख हिने आळंदी येथील जोग महाराज कुस्ती संकुलच्या अनुष्का भालेकरचा 6-20 अशा गुणाधिक्याने पराभव करून मावळ महिला श्री कुस्ती चषकावर आपले नाव कोरत मानाची चांदीची गदा पटकावली. तर अस्मी लोणारे, कृतिका पवार, सेजल वाळके, कोमल गाढवे यांनी आपआपल्या वजनी गटात विजेतेपद पटकावले आहे.
इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडेच्या अध्यक्षा संध्या थोरात यांना ही अभिनव कल्पना सुचली. मावळात अनेक महिला कुस्तीगीर तयार होत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले. कुस्ती हा मातीतला खेळ आहे. तिला लोकाश्रय मिळायला हवा. येथील महिला मल्लांना देश विदेश पातळीवर खेळायची संधी मिळायला हवी. अशा स्पर्धांतून त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे त्यांना वाटले. इनरव्हीलच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन रचना मालपाणी तालुक्यात फक्त महिलांकरिता आयोजित या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्या. प्रत्येक कुस्तीतील उत्कंठावर्धक क्षणाचा त्यांनी आनंद घेतला. या वीरांगनांना “खेळा आणि पुढे जा”, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )0
स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस समारंभ ऑलिम्पिकवीर व शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित पै. मारुती आडकर, इनरव्हिल क्लबच्या जिल्हाध्यक्षा रचना मालपाणी, इनरव्हिल क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षा संध्या थोरात, उपाध्यक्षा अर्चना देशमुख, सचिव निशा पवार, खजिनदार भाग्यश्री काळेबाग, चार्टर प्रेसिडेंट अल्भा पारेख,सहसचिव रश्मी थोरात, डॉ दीपाली झंवर, अल्पना हुंडारे, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र चॅम्पियन पै. खंडू वाळूंज, सचिव व राष्ट्रीय कुस्तीगीर पै.बंडू येवले, सहसचिव व महाराष्ट्र चॅम्पियन ॲड.पै.पप्पु कालेकर, साईबाबा कुस्ती संकुलचे संचालक व महाराष्ट्र चॅम्पियन पै. नागेश राक्षे, वस्ताद पै. धोंडिबा आडकर, पै. गजानन राक्षे यांच्या हस्ते झाले. आयोजकांच्या वतीने विजेत्या महिला कुस्तीगीरांना मेडल्स व रोख रक्कम बक्षीस देण्यात आले. पंच म्हणून राष्ट्रीय पंच बंडू येवले, पप्पू कालेकर, राकेश सोरटे, भानुदास घारे, सुरेश आडकर, समीर शिंदे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे –
३५ किलो वजनीगट
प्रथम – अस्मी लोणारे (तळेगाव)
द्वितीय – शौर्या यादव (आळंदी)
४० किलो वजनीगट
प्रथम – कृतिका पवार (खराडी)
द्वितीय – विदिशा कुलकर्णी (आळंदी)
४५ किलो वजनीगट
प्रथम – सेजल वाळके (भिमाकोरेगांव)
द्वितीय – अनुष्का दहिभाते (बेडसे)
५० किलो वजनीगट
प्रथम – कोमल गाढवे (आळंदी)
द्वितीय – कार्तिकी दौंडकर (आळंदी)
६० ते ७२ किलो (खुला गट) वजनीगट
प्रथम – सनम शेख (शिरगाव)
द्वितीय – अनुष्का भालेकर (आळंदी)
अधिक वाचा –
– दिवाळी सणाला गावी जाताय? मग हि बातमी तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची आहे….
– धक्कादायक! वडगाव मावळमध्ये एकाच घरातील तीन भावंडे बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरु
– ‘वेळ घ्या, पण आरक्षण द्या’, मनोज जरांगे पाटलांकडून दुसरं उपोषण मागे, कोणत्या अटींवर उपोषण सोडले? वाचा सविस्तर