Dainik Maval News : जागतिक आदिवासी दिनानिमित्त (दि. ९ ऑगस्ट) समस्त आदिवासी समाज मावळ, के.ए. ग्रुप मावळ, बिरसा ब्रिगेड मावळ यांच्या वतीने टाकवे बुद्रुक या ठिकाणी अष्टविनायक मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात आदिवासी दिवस संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आमदार सुनील शेळके, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव नगरीच्या नगरसेविका कु. सिया लक्ष्मण चिमटे होत्या. तसेच, पं. स. सभापती सुनिता येवले, जिल्हा परिषद सभापती दिपाली हुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात सकाळी ९ वाजता कान्हे फाटा येथून भव्य बाईक रॅलीने झाली. त्यानंतर कार्यक्रम स्थळी डीजे च्या तालावर तरुणाईने आदिवासी गीतांवर ठेका धरला. ढोल लेझीम पथकाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. सकाळी ठीक ११ वाजता प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा ब्रिगेड मावळच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत सहभागी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. मावळ तालुक्यातील आदिवासी भागातील नवनियुक्त सरकारी सेवेत भरती झालेल्या तरुणांना, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याचबरोबर या कार्यक्रमात बिरसा ब्रिगेड मावळच्या वतीने देण्यात येणारा आदिवासी समाजभूषण पुरस्कार आदिवासी संस्कृती प्रचारक भाऊमहाराज गवारी यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी अनेक आदिवासी नृत्य सादर केली. या कार्यक्रमासाठी शिरदे आणि कळकराई येथील आदिवासी महिलांनी नृत्य आणि आदिवासी लोकगीत सादर केली. अनेक बालक आणि युवकांनी पारंपारिक आदिवासी वेशभूषा परिधान करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदिनाथ झाडे यांनी आदिवासी चळवळ आणि आजचा विद्यार्थी या विषयावर मांडणी केली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सुनील शेळके यांनी आदिवासी समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आपल्या मनोगतात स्पष्ट केले. तेजस बगाड या विद्यार्थ्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि आव्हाने यावर आपले विचार मांडले.
कार्यक्रमासाठी पंचायत समिती मावळच्या सदस्या आशा मोरमारे, प्राची गायकवाड, राजेंद्र कडलक, रेश्मा देवकर, यांसह सुशांत बालगुडे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. विरणक सर यांनी प्रास्ताविक केले, चंद्रकांत तळपे आणि मराडे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. रमेश कोकाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांकडून भोजनव्यवस्था करण्यात आली होती.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
– तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द
– पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?
