Dainik Maval News : मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेले, वडगाव नगरीचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज आणि श्री हनुमान जन्मोत्सव अर्थात चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त उत्सव समितीच्या वतीने गुरुवार (दि. २ एप्रिल) ते शनिवार (दि ४ एप्रिल) दरम्यान विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र म्हाळसकर व उत्सव कमिटीचे पदाधिकारी यांनी ही माहिती दिली. यामध्ये भजन स्पर्धा, शोभेचे दारूकाम, छकडी बैलगाडा स्पर्धा, लोकनाट्य, ऑर्केस्ट्रा, निकाली कुस्त्यांचा आखाडा आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे.
पोटोबा महाराज उत्सव व हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवारी (दि.२) पहाटे देवस्थानचे विश्वस्त व उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पोटोबा महाराजांचा अभिषेक, सकाळी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा, सकाळी छबीना (पालखी मिरवणूक), दुपारी मानाचे बगाड व मानाच्या काठ्या, रात्री शोभेचे दारूकाम व भजन स्पर्धा होईल.
विजेत्या प्रथम पाच क्रमांकांना अनुक्रमे १८ हजार रुपये, १५ हजार रुपये, १२ हजार रुपये, १० हजार रुपये व पाच हजार रुपये याप्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत. ही सर्व बक्षीस रक्कम स्वर्गीय सोपानराव अण्णा म्हाळसकर यांच्या स्मरणार्थ चंद्रशेखर म्हाळसकर यांच्याकडून दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी संघाला दोन हजार रुपये व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. याशिवाय उत्कृष्ट गायक, वादक अशी वैयक्तिक पारितोषिकेही दिली जाणार आहेत.
त्यानंतर मनोरंजनाच्या कार्यक्रमात भिका भीमा सांगवीकर यांचे चिरंजीव गणेश – राजेश सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी (दि ३) सकाळी पालखी मिरवणुकीत आळंदीतील बाल भजनी मंडळाचा सहभाग असेल.
निकाली कुस्त्यांचा आखाडा ( स्व पै केशवराव ढोरे आखाडा) आखाडा स्थळ भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ
येथे दुपारी ५२ निकाली कुस्त्यांचा आखाडा होईल.आखाड्यात महिला खेळाडूंच्याही लढती होणार आहेत. विजेत्यांना १०१ रुपयांपासून १० हजार एक रुपयांपर्यंत बक्षीसे दिली जातील. पै. प्रशांत जगताप व पै. मनीष रायते यांच्यातील कुस्तीला चांदीची गदा व एक लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख इनाम असेल.
छकडी बैलगाडा स्पर्धेतील आकर्षक बक्षिसे
शनिवारी (दि ४) सकाळी छकडी बैलगाडा स्पर्धा होईल. स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांकांना अनुक्रमे ५१ हजार रुपये, ४१ हजार रुपये, ३१ हजार रुपये, २१ हजार रुपये व ११ हजार रुपये याप्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत. अंतिम फेरीतील प्रथम क्रमांकाला मोटारसायकल, द्वितीय व तृतीय क्रमांकाला स्कूटी, चौथ्या क्रमांकाला १५ हजार रुपये व पाचव्या क्रमांकाला १० हजार रुपये याप्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत. या शिवाय घाटाचा राजा चांदीची गदा, फळी फोडसाठीही ट्रॉफी अशी पारितोषिके आहेत.
शनिवारी (ता. ४) रात्री मनोरंजनाच्या कार्यक्रमात ‘नाद करा पण आमचा कुठं’ हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होईल. त्यात सिनेअभिनेत्री सुवर्णा काळे उपस्थित असतील. उत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र म्हाळसकर, कार्याध्यक्ष अतिश ढोरे,कार्यक्रम प्रमुख बाळासाहेब तुमकर,शेखर वहिले,सुहास विनोदे,उपाध्यक्ष गजानन भेगडे,अजय भवार,सुहास वायकर आदींनी नियोजन केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा
– लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल
– शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण

