Dainik Maval News : मावळ तालुक्यातील शिरोता वन विभागाच्या हद्दीतील पांगळोली परिसरात विनापरवानगी बेकायदेशीरपणे नाईट कॅम्पिंग करणाऱ्या दोघांवर वन विभागाने रविवारी (दि. ३१) धडक कारवाई केली आहे. वनक्षेत्रात विनापरवानगी ठोकण्यात आलेले तंबू या कारवाईत जप्त करण्यात आले असून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांगळोली येथील राखीव वन गट क्रमांक ३६ मध्ये काही इसमांनी वन क्षेत्रात अपप्रवेश करून तात्पुरत्या स्वरूपाचे कापडी तंबू उभारून राहण्यास आल्याचे समजल्यानंतर वाकसईच्या वनरक्षक मोहिनी शिरसाठ आणि कार्लाचे वनपाल सागर चुटके यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर ठिकाणी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता व्यावसायिक हेतूने नाईट कॅम्पिंग सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पुण्यातील दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रतीक खर्डीकर (३५, कर्वेनगर, पुणे) आणि श्रेयस केदार दामोदरे (२१, शनिवार पेठ, पुणे) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेले तंबू वन विभागामार्फत जप्त करून ताब्यात घेण्यात आले, वन विभागाने कारवाई करत घटनास्थळावरून कॅम्पिंगचे सर्व तंबू जप्त केले असून घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला आहे.
आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील चौकशी सुरु असल्याचे शिरोता विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी सांगितले. वनक्षेत्रात पर्यटनाच्या नावाखाली होणारे असे बेकायदेशीर प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. स्थानिकांना वनक्षेत्रामध्ये कोणताही संशयास्पद किंवा अनुचित प्रकार आढळून आल्यास त्यांनी तात्काळ वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन वनविभाग पुणे आणि वनपरिक्षेत्र कार्यालय शिरोता (ता. मावळ) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
– पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना
– भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
– जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना