Dainik Maval News : मावळमधील आंदर मावळ विभागाला जोडणाऱ्या टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर पडलेला मोठा खड्डा सध्या वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. खड्ड्यातील लोखंडी सळई वर आल्याने दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे टायर पंक्चर होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करावा लागत आहे.
टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदीवरील पूल हा आंदर मावळातील अनेक गावांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. येथून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, शालेय विद्यार्थी, कामगार आदीजण हे दुचाकी तसेच चारचाकी वाहनांनी ये-जा करीत असतात. कान्हे फाटा, तळेगाव दाभाडे आदी ठिकाणी कामानिमित्त जाणाऱ्या कामगारांची संख्याही मोठी आहे.
आंदर मावळ हा निसर्गरम्य परिसर असल्याने पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. यामुळे वाहनांची सतत वर्दळ असते. परिसरातील धबधबे व निसर्गस्थळांना भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात याभागात येत असताना याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे पुलावरील हा खड्डा स्थानिक नागरिकांसह पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने गंभीर समस्या बनला आहे.
विशेष म्हणजे आंदर मावळातील इतर काही रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र प्रशासनाकडून, संबंधित विभागाकडून या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. यासह स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या मार्गावरून ये-जा करतात, पण त्यांचेही दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. यामुळे मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनास जाग येणार का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
“लोकप्रतिनिधी अनेक विषयांवर रिल्स बनवतात; मग आमच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची रिल्स कधी बनणार?” असा खोचक प्रश्नही आंदर मावळातील नागरिकांकडून उपस्थित होत आहे. प्रशासनातील संबंधित विभागाने टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदीवरील या पुलाची तातडीने पाहणी करून डागडुजी करणे गरजेचे आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली
– मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण
– ३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत
