Dainik Maval News : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोणावळा शहरालगतच्या कार्ला वेहेरगाव गडावरील आई एकवीरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी व त्यांच्या सुलभ दर्शनासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज झाले असल्याची माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी दिली.
शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आईचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक वेगवेगळ्या भागातून येत असतात. येणाऱ्या भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी दररोज पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. तर शेवटचे दोन दिवस अर्थात दुर्गाष्टमी व महानवमीच्या दिवशी 24 तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
आई एकवीरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला रविवारी 11 ऑक्टोबर पासून घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी रविवार असल्यामुळे या दिवशी गडावर मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पहाटे लवकर देवीचा अभिषेक व पूजा आरती करून घटस्थापना विश्वस्त मंडळाच्या हस्ते केली जाणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये 15 ऑक्टोबर रोजी ललित पंचमी, 18 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन, 19 ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी व 20 ऑक्टोबर रोजी पहाटे महानवमी होम हे महत्त्वाचे दिवस असणार आहेत.
- आई एकवीरा देवीच्या गडावर विविध विकासकामे सुरू आहेत. कार्ला फाटा ते गड पायथ्यापर्यंत स्ट्रीट लाईट सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री व पहाटे प्रवास करणाऱ्या भाविकांना सुखकर होणार आहे. गडावर पायथा ते पार्किंग दरम्यानच्या पायऱ्यांचे काम झाले असून पुढील काम अद्याप शिल्लक असले तरी भाविकांना गडावर जाण्यासाठी व खाली येण्यासाठी विनाअडथळा प्रवास करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
गडावर व पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे. रेलिंग मध्ये उभ्या राहणाऱ्या भाविकांसाठी पंखे व पिण्याचे पाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी व सर्व सदस्य हे नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये भाविकांच्या स्वागतासाठी व त्यांच्या दर्शना सेवेसाठी गडावर उपस्थित असणार आहेत. नवरात्र उत्सव काळामध्ये मंदिर परिसरात सप्तशृंगी पाठ याचे पठण आठ दिवस केले जाणार आहे. मंदिराचा सर्व परिसर हा सिसिटिव्ही कॅमेर्याच्या निग्रहाणीखाली ठेवण्यात आला आहे.
खासदार व श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, वरिष्ठ उपाध्यक्ष मारुती देशमुख, उपाध्यक्ष सागर देवकर, सचिव नवनाथ देशमुख, सहसचिव महेंद्र देशमुख, खजिनदार व पुजारी संजय गोविलकर, सहखजिनदार विकास पडवळ, विश्वस्त अर्चना देवकर हे सर्व विश्वस्त मंडळ भाविकांच्या सुलभदर्शनासाठी कार्यरत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले
– “स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम
– मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

