Dainik Maval News : मध्यरात्री कामावरुन परतणाऱ्या कामगाराला तिघांनी मारहाण केली. तसेच ‘फोन पे’वरून रक्कम स्वत:च्या खात्यावर वळती करून घेतली. ही घटना दहा मे रोजी घडली. यावर बँकिंग आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे ‘फोन-पे’वरील डीपीच्या आधारे पाच दिवसांत छडा लावून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मुख्य आरोपीस अटक केली आहे.
फिर्यादी नागनाथ दिनकर मुंडफणे (वय २५, रा. वराळे ता. मावळ) हे चाकणकडून वराळे येथील घरी जात असताना, इंदोरी बायपास येथे तिघांनी नागनाथ यांना बळजबरीने दुचाकीवर बसविले. पुढे कोटेश्वरवाडी ते माळवाडी मार्गावर त्यांनी दुचाकी उभी करत दोन हजार रुपये ऑनलाइन पाठवण्याबाबत धमकावले.
दुसऱ्या व्यक्तीने दगडाची भीती दाखवत ‘फोन पे’ आणि मोबाइलचा पासवर्ड विचारला. तिसऱ्या व्यक्तीने मारहाण करुन मोबाइल हिसकावला. यानंतर तिघांनीही पळ काढला. दरम्यान, फिर्यादी यांनी दुसऱ्या दिवशी (११ मे) एटीएमवर जाऊन तपास केला असता, खात्यातून दहा हजार रुपये कमी झाल्याचे दिसले. यानंतर त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
आरोपींच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दोन पथके नेमली. त्यांनी बँकिंग आणि तांत्रिक विश्लेषण करुन, लोकेशन शोधले. ‘फोन पे’वरुन दहा हजार रुपये ज्या खात्यावर पाठविले, त्याच्या डीपी प्रोफाइल फोटोवरुन तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने पथक खेड तालुक्यातील शेलू येथे पोहोचले.
आरोपी पंकेश दत्तात्रय जाधव (२०, शेलू ता. खेड) याला शुक्रवारी (दि. १६) अटक करण्यात आली. वडगाव मावळ न्यायालयाने सुनावलेल्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीदरम्यान चौकशी केल्यानंतर मोटारसायकल, चोरलेला मोबाइल तसेच दहा हजार रुपये असा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला. या गुन्ह्यातील इतर दोन आरोपी अल्पवयीन असून, त्यापैकी एकाला चिखली येथून ताब्यात घेण्यात आले, तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे.
पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर, हवालदार अनंत रावण, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर सातकर, विनायक शेरमाळे, स्वराज साठे, भीमराव खिलारे आणि रमेश घुले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News