Dainik Maval News : मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर दरीत पडून मृत्यू झाल्याचे मानले जात असलेल्या केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात हे प्रकरण हत्येचे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन विशाल अग्रवाल प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. आतापर्यंत केतन अग्रवाल यांचा तोल जाऊन ते दरीत कोसळल्याने मृत्यू झाल्याचे मानले जात होते. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे प्रकरण अपघात नसून हत्येचे असू शकते, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी केतन अग्रवाल यांच्यासोबत त्यांची होणारी पत्नीही उपस्थित होती. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कथितरित्या होणाऱ्या पत्नीनेच केतन यांना धक्का दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणात नेमके काय घडले, घटनेपूर्वी दोघांमध्ये काही वाद झाला होता का, तसेच या कथित घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या नव्या घडामोडींमुळे सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून नोंदवलेल्या घटनेकडे आता वेगळ्या दृष्टीने पाहिले जात आहे. दरम्यान यासंदर्भात आज (दि.२३) दुपारी संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण हे पत्रकार परिषद घेणार आहेत.
संपूर्ण प्रकरण –
केतन अग्रवाल यांचा मृत्यू 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर झाला होता. त्यानंतर ही घटना पाय घसरून झालेला अपघात असल्याचे मानले जात होते. केतन हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे सुपुत्र होते. त्यांच्या निधनानंतर अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि व्यावसायिक क्षेत्रातही या घटनेची मोठी चर्चा झाली होती. त्यावेळी उपलब्ध माहितीनुसार, केतन हे किल्ल्याच्या परिसरात फिरत असताना दरीत पडल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे ही एक दुर्दैवी दुर्घटना असल्याचे चित्र समोर आले होते. मात्र, तपासातील नव्या निष्कर्षांमुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे.

विशेष म्हणजे, केतन अग्रवाल यांचा विवाह 26 नोव्हेंबर रोजी होणार होता आणि त्यासाठी कुटुंबात तयारीही सुरू झाली होती. 19 जून रोजी त्यांच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजे 18 जून रोजी दोघे लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. याच दरम्यान ही घटना घडली. लग्नाच्या तयारीच्या आणि आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता हत्येचा संशय व्यक्त झाल्यानंतर या प्रकरणामागील खरी कारणे काय आहेत, तसेच या घटनेत अन्य कोणाचा सहभाग होता का, याचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा
– बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त ; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल
– महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर




