इर्शाळवाडी सारख्या नैसार्गिक आपत्तीमुळे होणारी हानी टाळण्यासाठी अर्थशास्त्रात उपाय सांगितलेला आहे. हा उपाय सोपा आणि विनाखर्चाचा असल्यामुळे तो युध्दपातळीवर राबविण्यात यावा आणि अशा घटना भविष्यात घडू नये, यासाठी गाव, वाड्या वस्ती भोवती वृक्ष तटबंदी उभारावी. महाराष्ट्रात दर वर्षी कुठे ना कुठे भाजे, माळीण, इर्शाळवाडी सारख्या दरड कोसळणे किंवा भूस्खलन, पूर सारख्या नैसार्गिक आपत्तीमुळे मोठी जीवित आणि वित्तहानी होत असते. ( Chanakyas Arthashastra Has Given Solutions To Disasters Like Irshalwadi LandSlide )
सह्याद्रीच्या कुशीतील अनेक वाड्या-वस्त्यांना दरवर्षी जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे. अशा घटनांनंतर काही काळ ह्याचे पडसात उमटत रहातात, परंतु त्यावर कायम स्वरुपी तोडगा अजून निघालेला नाही. आता कायम स्वरुपी तोडगा काढणे गरजेचे आहे. डोंगराखालील सर्वच गावांचे सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन करणे, हा उपाय मोठा खर्चिक आणि तत्काळ न करता येणारा आहे. यासाठी प्रशासन व्यवस्था पुरेशी नाही. परंतू चाणक्यांनी इ.स.पू. 2 रे – 3 रे शतकातच यावर उपाय सांगितला होता. ‘चाणक्य अर्थशास्त्र’ हा एक महत्वाचा राजनीतीशास्त्रावरील ग्रंथ आहे. ह्यात राजकारणासोबत नगररचना, जनपदांची उभारणी, गावांचे रक्षण कसे करावे असे विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले आहे.
यात ‘जनपदाची वसाहत उभारणी’ एक प्रकरण आहे. शंभर ते पाचशे नागरीक असलेल्या वस्ती व गावाच्या भोवती रक्षणांसाठी ‘वृक्षांची तटबंधी ‘ उभारावी असे सांगितले आहे. यात वड, पिंपळ, उंबर, आंबा, पळस, शमी, शाल्मली हे वृक्ष असावेत याची यादी दिली आहे. पूर्वी भारतात वैदिक यज्ञ परंपरा होती. त्या यज्ञामध्ये महत्वाचे वृक्ष म्हणून ही वड, पिंपळ, उंबर, आंबा, पळस, शमी , शाल्मली काही वृक्षांचे गावाभोवती रोपण केले जात होते. या वृक्षांना धार्मिक महत्व देऊन ते कोणत्याही कारणांसाठी तोडण्याची परवानगी नसे. त्याचे कारणच या वृक्षांमुळे गावाचे रक्षण होत असे. आज आपण जे वृक्षारोपण करतो त्यात लवकर वाढणाऱ्या विदेशी वृक्षांचेच प्रमाण मोठे असते. त्यांची मुळे खोल नसतात व खोडही मोठे व मजबूत नसते. त्यामुळे या वनस्पती माती धरुन ठेऊ शकत नाहीत आणि पाण्यासारखा प्रवाह आडवू शकत नाहीत.
या उलट भारतीय वृक्ष जसे की वड, पिंपळ, उंबर, आंबा, पळस, शमी, शाल्मली ह्या वृक्षांचे आयुष्यमान अनेक शतके असते. त्याची मुळे जमीनीत खोलवर जातात, त्यामुळे हे वृक्ष उलमळून पडत नाहीत. या वृक्षांची सावली दाट असते आणि त्यावर विविध पक्षी वस्तीस येतात व त्याद्वारे आपोआप नवीन वृक्षारोपण होत राहते. पर्वतरांगावर पूर्वी सागवान सारख्या मजबूत झाडीची जंगले होती. बांधकाम व फर्निचरसाठी या जंगलांची बेसुमार तोड झाली त्यांच्या जागी नवीन वृक्ष लावले गेले नाहीत. ( Chanakyas Arthashastra Has Given Solutions To Disasters Like Irshalwadi LandSlide )
मात्र आज गरज आहे की प्रत्येक गावाभोवती वृक्ष तटबंदी उभे करण्याची जेणे करुन भविष्यात अशा घटनांची तीव्रता अत्यंत कमी होईल. त्यामुळे यापुढे वृक्षरोपण करताना फक्त शोभेचे वृक्ष न लावता ‘संरक्षक भारतीय वृक्ष” लावण्याचा अग्रह धरावा. विविध सामाजिक संस्थांनी अशा वाड्या वस्तींना भारतीय वृक्षांची झाडे उपलब्ध करुन द्यावीत. याबाबत जगजागृती मोहीम उभी करण्याची गरज आहे.
लेखक – अजित दि. देशपांडे (लेखक भारतीय विद्या पारंगत असून संत विचार अध्यासनचे प्रमुख आहेत.)
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळात भुस्खलनाचा धोका असलेल्या गावांमध्ये दुर्घटना होऊ नये यासाठी उपाययोजना करा – आमदार सुनिल शेळके
– माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेतील मुलांना ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मोठी मदत
– ‘हॅलो! तुमचे विम्याचे पैसे आलेत पण….’ वयोवृद्धाची मोठी आर्थिक फसवणूक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल