पुण्यातील ( Pune News ) कसबा आणि चिंचवड या दोन विधानसभांच्या पोटनिवडणूकांकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. आधीच उमेदवारीवरुन रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर आता अनेक लहान मोठ्या पक्षाचे पाठींबे कुणाला, असणार यावरुन राजकारण रंगले आहे. अशातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाने आपली भुमिका स्पष्ट करुन सर्वांनाच धक्का दिलाय. वंचितने चिंचवड पोटनिवडणूकीत राहुल कलाटे यांना पाठींबा देण्याचे ठरवले आहे. ( Chinchwad Assembly By Election Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi Support Rahul Kalate )
काय म्हटलंय वंचित बहुजन आघाडीने?
वंचित बहुजन आघाडीकडून याबाबत एक प्रेसनोट काढून पक्षाची भुमिका आणि निर्णय स्पष्ट करण्यात आला आहे.
“वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची दुरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे) बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकी संदर्भात चर्चा झाली. कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे, असे दिसतंय. परंतु काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे कसबा मतदारसंघात पाठिंबा द्यावा, असे विनंती पत्र आलेले नाही आणि म्हणून कसबा पोटनिवडणूकी संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही.
पहाटेच्या शपथविधीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि वरिष्ठांनी तसे आधीच ठरवले होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पहाटेच्या शपथविधी संदर्भात खुलासा केलेला आहे आणि त्यामध्ये सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष यांचाही आशीर्वाद होता, असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बीजेपी बरोबर जाणार नाही, असा कुठेही खुलासा केलेला नाही.
पिंपरी चिंचवडमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता आणि त्यांनी 1 लाख 12 हजार मते त्यावेळी घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे सभागृहाचे नेते आहेत. म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी, असा आमचा आग्रह होता. परंतु तसे घडले नाही.
गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती बदललेली आहे. वंचित बहुजन आघाडी पूर्ण विचार करून बीजेपीला पिपरी चिंचवड मतदारसंघात कोण थांबवू शकले तर राहुल कलाटे थांबवू शकतात, या मताला आली आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी एकमताने राहुल कलाटे यांच्या पाठीशी उभे राहील. यादृष्टीने पाठींबा देऊन निवडून आणण्याचे आवाहन पिंपरी चिंचवडमधील मतदारांना वंचित बहुजन आघाडी करत आहे.” असे पत्रक वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्याकडून प्रसिद्ध करु शकते.
अधिक वाचा –
– कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : मतदानापूर्वी तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस बंदी, वाचा संपूर्ण आदेश
– राहुल कलाटे उमेदवारीवर ठाम! चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीतून माघार घेण्यास नकार, तिरंगी लढतीने उडणार धुरळा