मोदी सरकारचा अजेंडा चालवणाऱ्या काही टीव्ही पत्रकारांच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला, त्याच्या मिरच्या भारतीय जनता पक्षाला का झोंबल्या? पत्रकारितेच्या नावाखाली धार्मिक तेढ वाढवण्याचे काम करणाऱ्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची गरज वाटत नाही म्हणूनच हा निर्णय घेतला त्यावर भाजपाने आकांडतांडव का करावे? इंडिया आघाडीला भाजपा घमंडिया, हुकूमशाही म्हणत आहे पण मागील साडेनऊ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीच खरे घमंडिया व हुकूमशाह आहेत, असे प्रत्युत्तर प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिले आहे. ( PM Narendra Modi has not held single press conference in the last 9 years said Maharashtra Congress )
भाजपाचा समाचार घेताना अतुल लोंढे म्हणाले की, जी-20 परिषदेसाठी आलेले अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना मोदी सरकारने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊ दिली नाही, त्यामुळे त्यांनी व्हिएतनाममध्ये जाऊन मोदी सरकारला कानपिचक्या दिल्या. भारतीय जनता पक्षाने 2014 साली एनडीटीव्हीच्या रविशकुमार यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. केरळचे पत्रकार सिद्दीकी कप्पन यांना उत्तर प्रदेश सरकारने हाथरस गँग रेप प्रकरणी वार्तांकन केल्याच्या आरोपाखाली UAPA कायद्याखाली अटक केली होती. 23 महिन्यानंतर त्यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. मराठा आरक्षणावर सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्याआधी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यातील संवाद व्हायरल झाला त्यासंदर्भातील पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्या ट्विट विरोधात महाराष्ट्रातील भाजपाप्रणित सरकारने तक्रार केली आहे. मुंबई-गोवा हायवेप्रश्नी आंदोलन कव्हर करत असताना भाजपा सरकारच्या पोलिसांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीमध्ये प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराशी हुज्जत घालून त्याची नोकरी घालवली. मोदी सरकारविरोधात ज्या पत्रकारांनी वार्तांकन केले त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यास भाग पाडले, देशभरात अशी अनेक उदाहरणे आहेत.
जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात १८० देशांच्या यादीत भारत 161 व्या क्रमांकावर आहे, यातूनच भारतात प्रसार माध्यमे किती स्वतंत्र आहेत हे स्पष्ट दिसते. देशात 2014 पासून प्रसिद्धी माध्यमावर भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारचा प्रचंड हस्तक्षेप होत आहे. देशातील बहुसंख्य प्रसार माध्यमे हीच भाजपाच्या जवळच्या उद्योगपतींनी खरेदी केली आहेत. संसदेत विरोधी पक्षांच्या नेत्यांचे माईक बंद करणे, विरोधी नेते बोलत असताना कॅमेरा दुसरीकडे वळवणे एवढ्या खालच्या पातळीवर भाजपा सरकार गेले आहे. त्यामुळे भाजपाने प्रसिद्धी माध्यमांचे स्वातंत्र्य व पत्रकार यांच्यावर बोलणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा प्रकार आहे, असे अतुल लोंढे म्हणाले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दारुंब्रे गावात आरोग्य शिबिर, 69 रुग्णांची मोफत तपासणी, अनेक तज्ज्ञांकडून उपयुक्त मार्गदर्शन
– आनंदाची बातमी! तळेगाव दाभाडे ते किल्ले रायगड थेट एसटी बस सेवा, दिनांक 30 सप्टेंबरपासून होणार सुरु
– पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प : राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आरपीआय वाहतूक आघाडी मैदानात