Dainik Maval News : वडगाव शहरातील एका २२ वर्षीय युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला वडगाव मावळ पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळाला असून मृत युवतीच्या कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्राण ज्ञानेश्वर येवले (वय २७, रा. वडगाव मावळ) असे असून, तो पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित युवतीने २४ जुलै २०२५ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी युवतीला सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात तपासादरम्यान दोन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपींपैकी एक असलेला प्राण येवले हा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता. गेल्या दहा महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. विविध ठिकाणी वास्तव्य बदलत असल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते.
वडगाव मावळ पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती तसेच विविध जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम राबवून त्याचा मागोवा घेण्यात आला. अखेर मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत अटक केली.
अटकेनंतर आरोपीला वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने प्रकरणाच्या तपासासाठी त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या चौकशीतून या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
– पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना
– भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
– जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना



