Dainik Maval News : लोणावळा शहराचे माजी नगरसेवक माणिक मराठे यांचे चिरंजीव अभय मराठे यांचा सोमवारी (५ ऑक्टोबर) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घरातील रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून ती अभय मराठे यांच्या छातीला लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे मराठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अभय मराठे हे त्यांच्या घरातील रायफलची साफसफाई करत असताना अचानक रायफलमधून गोळी सुटली. ही गोळी त्यांच्या छातीमध्ये लागल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. या घटनेची लोणावळा शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. रायफलमधून गोळी नेमकी कोणत्या परिस्थितीत सुटली, घटना कशी घडली आणि या घटनेमागील नेमके कारण काय आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत.
या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या तपासानंतरच घटनेबाबत अधिकृत आणि सविस्तर माहिती समोर येणार आहे. अभय मराठे यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर लोणावळा शहरात हळहळ व्यक्त होत असून, मराठे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ
– मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला
– शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक
