Dainik Maval News : आंद्रा धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत धरणग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. ८) वडगाव मावळ येथे मोर्चा काढला. धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे प्रलंबित प्रश्न आधी सोडवावेत. त्यानंतरच धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड शहराला देण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
आंद्रा धरणाच्या निर्मितीसाठी जमीन देऊन अनेक वर्षे उलटली, तरी संबंधित शेतकऱ्यांना वाढीव आणि योग्य मोबदला, अधिकृत धरणग्रस्त दाखले, पुनर्वसनाच्या सुविधा तसेच रोजगाराशी संबंधित प्रश्नांबाबत अद्याप दिलासा मिळालेला नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. त्यामुळे धरणग्रस्तांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करून त्यांचे प्रश्न निकाली काढावेत. हे प्रश्न प्रलंबित असताना धरणातील पाणी इतर शहराला देण्याचा निर्णय घेऊ नये, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
आंद्रा धरणाच्या निर्मितीसाठी टाकवे बुद्रुक, शिरे, फळणे, राजपुरी, बेलज, आंबळे, निगडे, पवळेवाडी, भोयरे, कोंडिवडे आणि कशाळ आदी गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. मात्र, या शेतकऱ्यांना अद्याप योग्य मोबदला आणि पुनर्वसनाच्या आवश्यक सुविधा मिळाल्या नसल्याचे आंदोलकांनी निवेदनात नमूद केले.
दरम्यान, नवलाख उंब्रे औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारामुळे परिसरातील लोकसंख्या वाढण्याची शक्यता आहे. परिणामी स्थानिक नागरिक आणि शेतीसाठी उपलब्ध असलेल्या पाण्यावर अधिक ताण येऊ शकतो, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे आंद्रा धरणातील पाणी इतरत्र वळविण्यापूर्वी स्थानिकांच्या पाणीहक्काचा विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली.
या मोर्चात भरत मोरे, नारायण ठाकर, अॅड. सोमनाथ पवळे, भिकाजी भागवत, तुकाराम असवले, काळूराम मालपोटे, काळूराम भोईरकर, शिवाजी असवले, अतिश परदेशी, शिवाजी करवंदे, नवनाथ मुंढारकर, मोहन घोलप, पंढरीनाथ पिंगळे, संभाजी कडू, विकास असवले, चंद्रकांत मोढवे, नवनाथ मालपोटे, गोपाळ पवळे आणि संदीप कल्हाटकर यांच्यासह धरणग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले
– “स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम
– मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

