Dainik Maval News : काले गावच्या (ता. मावळ) हद्दीत रस्त्याची कडा अचानक खचल्याने एक कार थेट शेतात उलटून अपघात झाल्याची घटना घडली होती. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला, तसेच कारचे मोठे नुकसान झाले. परंतु अपघाताच्या चार दिवसांनंतरही या ठिकाणी संबंधित विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्याने संताप व्यक्त होत असून प्रशासन गंभीर अपघाताची वाट पाहतंय का? असा सवाल नागरिक विचारत आहे.
सध्या पावसाळी पर्यटनाचा हंगाम सुरू असल्याने पवना धरण, तिकोणा, तुंग, लोहगड, विसापूर आणि इतर पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी होत आहे. या ठिकाणांकडे जाण्यासाठी पवनानगर येथूनच पुढे काले मार्गे जावे लागते. परंतु धोकादायक रस्ते, खोल खड्डे आणि वाहून गेलेले साईड पट्टे यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची योग्य दुरुस्ती आणि धोकादायक ठिकाणी संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आल्या असत्या, तर अशा घटना टाळता आल्या असत्या, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. काले परिसरातील रस्त्याचा खचलेला भाग, वाहून गेलेले साईड पट्टे आणि धोकादायक खड्ड्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या
– मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता
– लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख
– रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी


