पुण्यातील कसबा पाठोपाठ चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठीही महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण असणार हे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आणि पिंपरी-चिंचवडचे ‘कारभारी’ अजित पवार यांच्या उपस्थित सोमवारी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. त्यानंतर चिंचवड पोटनिवडणूकीसाठी मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा येथील अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आला असून नाना काटे यांना उमेदवारी मिळाली आहे. जयंत पाटील यांनी याबाबत ट्विट केले आहे. ( Chinchwad VidhanSabha Constituency By Election NCP Party Announced Candidature For Nana Kate )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शनिवारी भारतीय जनता पार्टीने कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणचे आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले होते. त्यानुसार हेमंत नारायण रासने यांनी काल (सोमवार, 6 फेब्रुवारी) मोठ्या शक्ती प्रदर्शनासह कसबा मतदारसंघाकरिता भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरला. त्यापाठोपाठ स्व. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी श्रीमती आश्विनी लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज भरला. तसेच मविआकडून कसबा मतदारसंघासाठी रवींद्र हेमराज धंगेकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला.
दोन ठिकाणी भाजपाच्या अधिकृत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आणि कसब्यात मविआकडून काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी अर्ज भरल्यानंतर सर्वांनाच उत्सुकता होती, ती चिंचवडसाठी मविआकडून अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार. अखेर इच्छुकांची अधिकची संख्या पाहता, अजित पवार यांनी सोमवारी सायंकाळी स्वतः बैठक घेतली. त्यानंतर अखेर सर्वांची समजूत काढल्यानंतर पक्षाकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. आज (मंगळवार, 7 फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या शक्तीप्रदर्शनासह नाना काटे यांचा अर्ज दाखल केला जाईल, अशी माहिती समोर येत आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.@OfficeofUT @NANA_PATOLE
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 7, 2023
खरेतर मविआतून या जागेवर शिवसेनेने (ठाकरे गट) आपला हक्क सांगितला होता. तसेच राष्ट्रवादीनेही या जागेवर हक्क सांगितला. मात्र, महाविकासआघाडीने कसबा काँग्रेस लढवणार आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार असणार, हे स्पष्ट केल्याने इथे राष्ट्रवादीचाच उमेदवार असेल हेही स्पष्ट झाले. त्यानंतर राष्ट्रवादीतील इच्छुकांची भाऊगर्दी लक्षात घेता, नाना काटे आणि राहुल कलाटे यांची नावे चर्चेत होती. अखेर यावर तोडगा निघाला असून नाना काटे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत मोठा ट्विस्ट! शंकर जगताप यांनीही भरला उमेदवारी अर्ज, लगेच वाचा
– मोठी बातमी! महाविकासआघाडीचं ठरलं, कसब्याची जागा काँग्रेसकडे आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढणार