देशात सध्या लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु आहे. काँग्रेसची सत्ता मोडीत काढत 2014 साली सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने यंदा मोदी 3.0 चा नारा दिला आहे. काँग्रेसच्या घराणेशाहीला विरोध हा आजपर्यंत भाजपाचा प्रचाराचा मुद्दा राहिला आहे. यंदाही प्रत्यक्षात नरेंद्र मोदी यांनीच या घराणेशाहीच्या मुद्द्याला हात घालत, प्रचार सुरु केलाय. अशात महाराष्ट्रातील 48 जागांवरील उमेदवारांबाबत अभ्यास केला असता आणि उमेदवारांचा इतिहास तपासला असता, राज्यात किती पक्षांनी प्रत्यक्षात घराणेशाही नाकारली आणि किती पक्षांनी तीच पुन्हा स्विकारली, ह्याचे चित्र स्पष्ट झालंय. आश्चर्याची बाब म्हणजे देशभर घराणेशाहीच्या नावाने बोंब मारणाऱ्या भाजपाने राज्यात सर्वाधिक घराणेशाहीतील उमेदवारांना तिकीट दिल्याचे दिसतंय. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाराष्ट्रात आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या प्रमुख पक्षांच्या एकूण उमेदवारांपैकी 28 उमेदवार हे प्रस्थापित राजकीय घराण्यातील असल्याचे दिसतात. राजकीय घराण्यांचा नात्यांचा धागा कुठे ना कुठे या उमेदवारांपर्यंत पोहोचताना दिसतोय. महत्वाचे म्हणचे घराणेशाहीवर सर्वाधिक टीका करणाऱ्या भाजपाचे या 28 मध्ये 11 उमेदवार आहेत. चलातर मग पाहूयात पक्षनिहाय उमेदवारांची राजकीय पार्श्वभूमी – ( Family in Maharashtra politics Political dynasties in state BJP NCP Shivsena Congress )
भारतीय जनता पार्टी –
1. पंकजा मुंडे, बीड मतदारसंघ – दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या.
2. उदयनराजे भोसले, सातारा मतदारसंघ – माजी आमदार अभयसिंहराजे यांचे पुतणे.
3. रणजितसिंह निंबाळकर, माढा मतदारसंघ – दिवंगत माजी खासदार हिंदुराव निंबाळकर यांचे पुत्र.
4. अनुप धोत्रे, अकोला मतदारसंघ – खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र.
5. नवनीत राणा, अमरावती मतदारसंघ – आमदार रवी राणा यांच्या पत्नी.
6. डॉ. सुजय विखे, अहमदनगर मतदारसंघ – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे पुत्र.
7. डॉ. भारती पवार, दिंडोरी मतदारसंघ – दिवंगत माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा आहेत.
8. स्मिता वाघ, जळगाव मतदारसंघ – वडील पंचायत समिती सभापती. स्वतः जिल्हा परिषद अध्यक्षा होत्या.
9. डॉ. हिना गावित, नंदुरबार मतदारसंघ – मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या.
10. रक्षा खडसे, रावेर मतदारसंघ – माजी मंत्री, आ. एकनाथ खडसे यांच्या सून.
11. डॉ. सुभाष भामरे, नंदुरबार मतदारसंघ – माजी आ. गोजरताई भामरे यांचे पुत्र.
शिवसेना (एकनाथ शिंदे) –
1. संजय मंडलिक, कोल्हापूर मतदारसंघ – दिवंगत माजी खासदार सदाशिव मंडलिक यांचे पुत्र
2. धैर्यशील माने, हातकणंगले मतदारसंघ – मा. खा. निवेदिता माने यांचे पुत्र.
3. राजश्री पाटील, यवतमाळ मतदारसंघ – हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी.
4. श्रीकांत शिंदे, कल्याण मतदारसंघ – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र. दुसऱ्यांदा उमेदवारी.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे –
1. ओमराजे निंबाळकर, धाराशिव मतदारसंघ – पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र
2. संजय दिना पाटील, मुंबई उ .पू. मतदारसंघ – मा. आमदार दीना बामा पाटील यांचे पुत्र
3. अमोल कीर्तिकर, मुंबई उ.पू. मतदारसंघ – माजी खा. गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव.
4. करण पवार, जळगाव मतदासंघ – माजी आमदार भास्कर पाटील यांचे नातू.
5. सत्यजित पाटील, हातकणंगले मतदारसंघ – माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचे पुतणे.
6. राजाभाऊ वाजे, नाशिक – आजोबा शंकरराव वाजे हे आमदार होते. स्वतः आमदार.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) –
1. सुनेत्रा पवार, बारामती मतदारसंघ – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार –
1. सुप्रिया सुळे, बारामती मतदारसंघ – माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या कन्या.
2. धैर्यशील मोहिते, माढा मतदारसंघ – माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे
3. अमर काळे, वर्धा मतदारसंघ – माजी आ. डॉ. शरद काळेंचे पुत्र
काँग्रेस (आय) –
1. प्रणिती शिंदे, सोलापूर मतदारसंघ – माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या. स्वतः आमदार.
2. गोवाल पाडवी, नंदुरबार मतदारसंघ – माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे पुत्र.
3. प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर मतदारसंघ – दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी.
अधिक वाचा –
– शाब्बास…! एकविरा विद्या मंदिर शाळेचे 5 विद्यार्थी एन.एम.एम.एस. परीक्षा गुणवत्ता यादीत चमकले । Karla News
– ‘मावळ मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक’, नात्यागोत्याच्या राजकारणावर श्रीरंग बारणेंचे रोखठोक उत्तर
– ‘समोरच्या उमेदवाराचे किती आव्हान असेल?’ श्रीरंग बारणे म्हणाले, ‘समोर कोण उमेदवार आहे माहिती नाही…’